डोंबिवली : पुढारी ऑनलाइन डेस्क | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांची बदली झाली असून त्यांची बढती करण्यात आली असल्याचे सांगितले जात आहे. तर डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त असलेल्या इंदुराणी जाखड यांनी गेल्या काही वर्षांपासून शहरात धडाकेबाज निर्णय घेऊन बिल्डर लॉबीला चांगलाच दणका दिला. कल्याण डोंबिवली परिसरात अनधिकृत बांधकामांवर आयुक्त इंदुराणी जाखड यांनी कडक कारवाई केली होती. जाखड यांच्या या कारवाईमुळे कल्याण आणि डोंबिवली शहरात चांगले काम होत असल्याचे निर्दशनास येत होते.
17 नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांची कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्तीपदी नियुक्ती करण्यात आली होती. दोन वर्षांच्या कार्यकाळानंतर आता जाखड यांची बदली करण्यात आली आहे. डॉ. इंदुराणी जाखड यांची पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके 31 मार्च 2025 रोजी सेवा निवृत्त झाल्याने पालघरचे जिल्हाधिकारी पद रिक्त झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी डॉ. इंदुराणी जाखड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.