केडीएमसी मुख्यालयासमोर मटणाची विक्री होणारच pudhari photo
ठाणे

KDMC headquarters mutton sale : केडीएमसी मुख्यालयासमोर मटणाची विक्री होणारच

हिंदू खाटीक समाजाने लावला निषेधाचा बॅनर; मांस-मटणाच्या फतव्यावरून प्रकरण चिघळण्याची चिन्हे

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीत महापालिकेने कत्तलखान्यांसह मांस/मटण विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा काढलेला फतवा वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे. या फतव्यावरून प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. केडीएमसी मुख्यालयासमोर मटणाची विक्री होणारच, असा पावित्रा घेणार्‍या हिंदू खाटीक समाजाने निषेधाचा बॅनर लावून संताप व्यक्त केला आहे.

39 वर्षांपूर्वीच्या शासन निर्णयाचा आधार घेऊन कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने येत्या शुक्रवारी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी हद्दीतील कत्तलखान्यांसह चिकन, मटण, मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा फतवा जारी केला आहे. या फतव्याच्या विरोधात तंतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. केडीएमसीच्या या निर्णयाचा निषेध करणारा बॅनर हिंदू खाटीक समाज संघटनेने केडीएमसीच्या कल्याण मुख्यालयासमोर लावला आहे. हा बॅनर सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.

या पार्श्वभूमीवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी पालिकेच्या निर्णयाचा निषेध केला आहे. नागरी समस्या सोडविण्याचे सोडून हे नसते उद्योग केडीएमसी प्रशासन का करत आहे ? असा सवाल युवा नेते आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. कुणी काय खावे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. असे असताना ठरावाचा आधार घेऊन केडीएमसी प्रशासनाने काढलेला आदेश पूर्णत: चुकीचा आहे. हा आदेश तात्काळ रद्द करावा, अशी मागणी हिंदू खाटिक समाजाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.

15 ऑगस्ट हा देशाचा स्वातंत्र्य दिवस व त्याच दिवशी श्रीकृष्ण जयंती देखिल आहे, त्यात श्रावण ! अर्थातच बहुसंख्य लोक त्यादिवशी शाकाहार करणे पसंत करतील. परंतु काहीतरी निमित्त काढून जर कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त त्या दिवशी मटण व मच्छी विक्री वर बंदी आणण्याचा फतवा काढत असतील तर त्याला विरोध तर होणारच. 15 ऑगस्टला मांसाहारी हॉटेल्स, उपाहारगृह बंद ठेवणार आहात का? कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्राला लागूनच असलेल्या ठाणे, उल्हासनगर, नवीमुंबई महानगरपालिका व जिल्हा परिषद क्षेत्रात असा कुठलाच फतवा काढला नसताना आमच्या आयुक्तांना ही उपरती का झाली हे अनाकलनीय आहे.

गेल्या अनेक वर्षांत केडीएमसीत शेकडोच्या संख्येने निघालेल्या शासनाच्या अध्यादेशांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली नाही. अंमलबजावणी केली असती तर ही दोन्ही शहरे स्वच्छ, सुंदर आणि बकालपणापासून वाचली असती. शासनाचे आदेश काटेकोर पाळले असते तर बेकायदा बांधकामांचे पीक आले नसते. जुनापुराणा आदेश काढून मटण/मांस विक्रीची दुकाने बंद करून या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांच्या रोजीरोटीवर गदा आणणार्‍या अधिकार्‍यांची कीव येते, अशी प्रतिक्रिया कल्याणच्या ठाकरे गटाचे माजी शहरप्रमुख सचिन बासरे यांनी दिली.

कुणी काय खावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य

आमचा या फतव्याला विरोध आहे. ज्यांना जे खायचे ते खावे, कुणी काय खावे याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. आयुक्तांनी हा फतवा मागे घ्यावा. उगीचच चांगल्या दिवशी आमच्या व प्रशासनाच्या डोक्याला ताप देऊ नये. ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्तांना विनंती आहे की चांगल्या दिवशी होऊ घातलेला संघर्ष टाळावा, याकडे माजी आमदार तथा मनसेचे नेते राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांच्यासह ठाणे जिल्हा शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे एक्स पोस्टद्वारे लक्ष केंद्रित केले आहे.

बघू कोण कारवाई करायला येतो -आमदार डॉ. आव्हाड

हिंदू खाटिक समाजाच्या कल्याण-डोंबिवली शाखेने केडीएमसी मुख्यालयासमोर बॅनर लावून मनमानी निर्णयाचा निषेध व्यक्त केला आहे. हा निर्णय मागे न घेतल्यास 15 ऑगस्टच्या दिवशी याच मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर मटण विक्रीचे दुकान थाटण्याचा इशारा हिंदू खाटिक समाज संघटनेचे अध्यक्ष शिरीष लासुरे यांंनी दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी शासन आणि महापालिकेच्या या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. कुणी काय खावे हे सांगणारी महापालिका ही काय तुमची वतनदारी आहे का? सगळे वाद संपल्यामुळे हा आता शाकाहारी/मांसाहरी वाद सत्ताधार्‍यांनी बाहेर काढला आहे. 15 ऑगस्ट दिवशी कल्याणमध्ये येऊन मटण खातो, बघू कोण कारवाई करायला येतो ते बघतो, असा इशारा आमदार डॉ. आव्हाड यांनी केडीएमसीला दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT