कल्याण : सतीश तांबे
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची यंदाच्या पालिका निवडणूक मागील दहा वर्षांपूर्वीच्या निवडणुकीच्या तुलनेने केवळ एक लाख 73 हजार 874 मतदार वाढल्याने वाढीव मतदार संख्या 12.20 टक्के इतकी आहे. यामध्ये वाढलेल्या मतदानात महिला मतदारांची संख्या धक्कादायक असून महिलांची वाढीव मतदार संख्या दहा हजार संख्येचा आकडा गाठू शकला नाही, ही बाब चिंतेची आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाचव्या पंचवार्षिक पालिका निवडणुकीचा कालावधी नोव्हेंबर 2020 साली संपुष्टात आल्यानंतर सहावी पालिका पाच वार्षिक पालिका निवडणुका कोरोनाच्या संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आली व शासनाने पालिकेवर प्रशासकीय राजवट लागू केली. कोरोनाचा संसर्ग ओसरल्यावर आता निवडणुका घेतल्या जातील, उद्या निवडणुका घेतल्या जातील, या आशेवर निवडणुकीला उभ्या राहणाऱ्या इच्छुकांनी पाण्यात देव बुडवून ठेवले होते.
शासनाने राज्यातील कालावधी संपुष्टात आलेल्या सर्वच महापालिका बरखास्त केल्याने अखेर राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने तब्बल दहा वर्षाच्या कालावधीनंतर केडीएमसी निवडणूका होणार आहेत. पालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर पालिकेच्या निवडणूक विभागाने गुरुवारी मतदार यादी प्रसिद्ध केली.
या मतदार यादीत 2015 साली पालिका निवडणुकी वेळी एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 762 होती. यामध्ये पुरुष मतदार 5 लाख 81 हजार 916 तर महिला मतदार 6 लाख 68 हजार 730 असे 12 लाख 50 हजार 646 मतदार होते. निवडणुकीत 3 लाख 16 हजार 638 पुरुष मतदारांनी तर 2 लाख 54 हजार 840 महिला मतदार अशा एकूण 5 लाख 71 हजार 468 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत 45.69 टक्के मतदान झाले होते.
मागील दहा वर्षा पूर्वीच्या 2015 सालच्या निवडणुकीच्या तुलनेने पालिका क्षेत्रातील निवडणुकीसाठी एकूण लोकसंख्या 15 लाख 18 हजार 763 इतकी असून 14 लाख 24 हजार 520 एकूण मतदार संख्या आहे. यामध्ये पुरुष मतदार 7 लाख 45 हजार 392 तर महिला मतदार 6 लाख 78 हजार 576 व इतर 552 मतदारांचा समावेश आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेने यंदाच्या निवडणुकीत 1 लाख 73 हजार 874 मतदार वाढले असून यामध्ये 1 लाख 63 हजार 476 पुरुष तर 9 हजार 846 मतदारांची संख्या आहे.
या वाढीव मतदार संख्येत मागील निवडणुकीपेक्षा एकूण 12.20 टक्क्यांनी मतदाराची वाढ झाली. पुरुष मतदारांची 21.93 टक्क्यांनी वाढ झाली, तर महिला मतदारांची 1.45 टक्के वाढ झाली. ही संख्या नगण्य असून या पालिका निवडणुकीत महिला मतदारांनी अनुत्सुकता दाखवित पाठ फिरविल्याचे दिसून येत आहे.
पालिकेच्या 122 जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या चार सदस्यांचे 29 प्रभाग व तीन सदस्यांचे दोन प्रभाग अश्या 31 प्रभगात सर्वात जास्त मतदार असलेला प्रभाग क्र.31 मध्ये 67 हजार 301 मतदार असून यात पुरुष मतदार 36 हजार 933, महिला मतदार 30 हजार 362 तर इतर 6 मतदार यांचा समावेश आहे, तर सर्वात कमी मतदार असलेला प्रभाग क्र. 6 हा असून या प्रभागात एकूण 28 हजार 873 मतदार असून यामध्ये 15 हजार 68 पुरुष मतदार 13 हजार 905 महिला मतदारांचा समावेश आहे.
मतदार वाढीची कारणे
मतदार संख्या वाढीसाठी दरवर्षी राज्य शासनाच्या निवडणूक विभाग कडून मतदार नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात असतो. मुंबई ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूर, वसई-विरार, मीरा भाईंदर व पनवेल आदी शहरांचा मुंबई मेट्रोपॉलिटन रिजनमध्ये समावेश असल्याने या शहरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी असल्याने देशभरातील परप्रांतीय नागरिकाचे लोंढेच्या लोंढे नोकरी व्यवसायासाठी या शहरात येत असून आपल्या कुटुंबासह वास्तव्य करीत असल्याने या परप्रांतीयांची सर्वच राजकीय पक्ष आपल्या राजकीय हेतूने आपल्या पक्षाची मतदार संख्या वाढण्यासाठी मतदार नावनोंदणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम राबविले जात असतात. ही मतदार वाढीची कारणे आहेत.
मतदार संख्या कमी होण्याची कारणे...
मुंबई, ठाणे शहरात कामधंद्यासाठी जाणाऱ्या नोकरदार वर्गाला कामाच्या व्यापातून मतदार नोंदणी करता येत नाही, तर मतदार नोंदणीच्या सर्वांच्या वेळी घराला टाळे असल्याने मतदार नोंदणी यादीतून बाद केली जातात. काही मतदार भाड्याच्या घरात राहत असल्याने जुन्या राहण्याच्या घरावर काढलेले मतदान नावनोंदणी कार्डाचा पत्ता बदलत नसल्याने मतदार तपासणीच्या वेळी मतदान नाव नोंदणी केलेल्या पत्त्यावर मतदार राहात नसल्याने त्याची नावे वगळली जात असतात. ही मतदार संख्या कमी करणे आहेत. तसेच दुबार मतदार नावे यादीत असल्याने ही दुबार नावे मतदार यादीतून वगळण्याचे कामे सुरू असल्याने मतदार यादीतील नावे मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा परिणाम यंदाच्या पालिका निवडणुकीतील मतदार यादीतील मतदार संख्या वाढीव संख्येवरून दिसून येत आहे.