KDMC Election Results 2026 Live Updates pudhari photo
ठाणे

KDMC Election Results 2026 Live Updates: कल्याण-डोंबिवलीचा फैसला आज! महायुती बाजी मारणार की विरोधक धक्का देणार?

Kalyan Dombivli Election Results Live: कल्याण-डोंबिवलीचा गड कोण जिंकणार? प्रत्येक प्रभागाचा निकाल आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा!

मोहन कारंडे

KDMC Election Results 2026 Live Updates

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीसाठी गुरूवारी चुरशीने मतदान पार पडले. आज (दि. १६) मतमोजणी होत असल्याने उमेदवारांसह कार्यकर्त्यांची धाकधूक वाढली आहे. या निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या ४८८ उमेदवारांचे भवितव्य आज मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. संपूर्ण शहरातील ३१ प्रभागांमधील १,५४८ मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया काल पार पडली. दरम्यान, मतदाना आधीच सत्ताधारी महायुतीने विरोधकांना हादरा देत एकूण १२२ सदस्यांपैकी आपले २१ उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत.

या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे हे इथले खासदार असल्याने शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. दुसरीकडे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा डोंबिवली हा विधानसभा मतदारसंघ असल्याने भाजपनेही येथे मोठी ताकद लावली आहे. महायुती विरुद्ध शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे यांच्यात यंदा थेट आणि अटीतटीचा मुकाबला पाहायला मिळत आहे.

२१ जागांवर महायुतीचे नगरसेवक बिनविरोध

कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये भाजपाचे १५ आणि शिवसेना ६ मिळून २१ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. त्यापैकी १९ बिनविरोध उमेदवार डोंबिवलीकर आहेत. डोंबिवली हा भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. चव्हाण यांनी तब्बल १५ उमेदवार बिनविरोध निवडून आणण्याची किमया साधली. खासदार श्रीकांत शिंदे यांनीही आपले कौशल्य दाखवत तेथे शिवसेनेचे सहा नगरसेवक बिनविरोध निवडून आणले.

कल्याण-डोंबिवलीत भाजपाच्या रंजना पेणकर, आसावरी नवरे, मंदा पाटील, ज्योती पाटील, रेखा चौधरी, मुकंद तथा विशू पेडणेकर, महेश पाटील, साई शेलार, दिपेश म्हात्रे, जयेश म्हात्रे, हर्षदा भोईर, डॉ. सुनिता पाटील, पूजा म्हात्रे, रविना माळी, मंदार हळबे हे उमेदवार बिनविरोध विजयी झाले आहेत.

भाजपने त्यांच्या वाट्याला आलेल्या ५४ पैकी ३७ जागांवर डोंबिवली परिसरात उमेदवारी दिली होती. कल्याण पूर्व, पश्चिम, कल्याण ग्रामीणमध्ये भागात १७ जणांना उमेदवारी दिली होती. डोंबिवलीमध्ये भाजपचे २३ उमेदवार रिंगणात होते त्याचा फैसला आज आहे.

'या' लढती ठरणार लक्षवेधी

प्रमुख प्रभागांतील काही पॅनेलमधील लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. यामध्ये प्रभाग क्रमांक २५ मध्ये भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांना उमेदवारी नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला. त्यांच्याविरोधात भाजपचे समीर चिटणीस आणि नंदू म्हात्रे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. प्रभाग क्रमांक २२ मध्ये भाजपचे प्रकाश भोईर आणि मनसेचे संदेश पाटील यांच्यातही चुरस होईल. प्रभाग क्रमांक २९ मध्ये शिंदे गटाचे उमेदवार नितीन पाटील आणि रवींद्र पाटील यांची भाजपच्या मंदार टावरे आणि अलका म्हात्रे यांच्यात चुरस होईल. प्रभाग क्रमांक ६ (कल्याण) येथे शिंदे गटाचे संजय पाटील तर ठाकरे गटाचे उमेश बोरगावकर आमने-सामने आहेत. त्याचबरोबर प्रभाग क्रमांक २०, १२ (क), ७ (क) आणि ८ (क) येथील लढती देखील लक्षवेधी ठरणार आहेत.

सर्वांचे लक्ष 'पॅनल २९' कडे!

डोंबिवलीतील पॅनल क्रमांक २९ मध्ये महायुती असूनही भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकमेकांविरुद्ध थेट लढत झाली. भाजपच्या उमेदवारांसमोर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रिंगणात आहेत. पॅनल क्रमांक २९ हे डोंबिवली पूर्वेत आहे. या पॅनलमध्ये शिवेसना आणि भाजपमध्ये थेट लढत झाली. या पॅनलमध्ये आधी महायुतीच्या उमेदवारांची घोषणा झाली होती. परंतू शिवसेनेने दोन उमेदवारांना एबी फॉर्म दिल्याने ही निवडणूक थेट भाजप विरुद्ध शिवसेना झाली आहे, या लढतींकडेही डोंबिवलीकरांचे लक्ष आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT