ठाणे

Kalyan News : केडीएमसी चालकाचा दारूच्या नशेत प्रताप; फेरीवाल्यांकडे हप्ता मागणे पडले महाग, बेदम धुलाई!

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या 'ग' प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या चालकाचा प्रताप एका प्रकरणातून उघडकीस आला आहे. आपत्कालीन कक्षाशी संबंधित असलेला हा चालक मद्यधुंद अवस्थेत बुधवारी सायंकाळच्या सुमारास उर्सेकरवाडीतील पूजा-मधुबन सिनेमागृहासमोर बसलेल्या फेरीवाल्यांकडे हप्ते मागायला गेला. त्यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांकडून या हप्तेखोर चालकाची यथेच्छ धुलाई करण्यात आली.

पावसाळ्याच्या दिवसांत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने सर्व प्रभाग क्षेत्रांमध्ये आपत्कालीन कक्ष कार्यान्वित केला आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 'ग' प्रभाग क्षेत्रात असलेल्या आपत्कालीन कक्षात या चालकाची नेमणूक असतानाही तो फेरीवाला पथकाचे वाहन चालवत असल्याचे उजेडात आले आहे.

बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास हा चालक उर्सेकरवाडीत गेला आणि पूजा-मधुबन सिनेमागृहासमोर बसलेल्या फेरीवाल्यांकडे दोन हजार रुपयांची मागणी केली. केडीएमसीने अवैध धंदे आणि फेरीवाल्यांवर कारवाईचा फास करकचून आवळला असल्याने स्टेशन परिसरातील फेरीवाले हद्दपार झाले आहेत. काही जण चोरून-लपून उर्सेकरवाडीतील पूजा-मधुबन सिनेमागृहासमोर धंदे करत आहेत. "धंदे बंद असल्यामुळे या चालकाला पैसे कुठून आणि का म्हणून द्यायचे?" असा सवाल करत फेरीवाल्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला.

मद्याच्या अंमलाखाली असलेल्या या चालकाने फेरीवाल्यांना शिवीगाळ केली; त्यामुळे संतप्त झालेल्या फेरीवाल्यांनी या चालकाला पकडून बेदम मारहाण केली. या झटापटीत त्याने गुप्ता नावाच्या एका फेरीवाल्याच्या गळ्यातील सोन्याची चेन तोडली. सोन्याची चेन गहाळ झाल्यामुळे तो फेरीवाला आणखीच आक्रमक झाला. अखेर नुकसानभरपाईची मागणी केल्याने भयभीत झालेल्या चालकाला त्या फेरीवाल्याला २० हजार रुपये द्यावे लागले.

हे प्रकरण पोलिस ठाण्यात जाण्यापूर्वीच आपापसात मिटविण्यात आल्याची खमंग चर्चा सध्या केडीएमसीच्या कर्मचारी वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, वादग्रस्त असलेल्या या चालकाकडून खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असून सार्वजनिक ठिकाणी मद्यधुंद अवस्थेत हप्तेमागणी करणाऱ्या या चालकाची चौकशी करून त्याला तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT