Kalyan Dombivali | खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर केडीएमसीचा हातोडा  
ठाणे

Kalyan Dombivali | खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर केडीएमसीचा हातोडा

बेकायदा बांधकाम प्रकरणी तक्रारदार प्रताप चौधरी यांच्या हत्येनंतर मोठी कारवाई

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : अखेर खंबाळपाड्यातील वादग्रस्त बंगल्यावर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडून गुरूवारी कारवाई करण्यात आली. बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाबत तक्रार करणाऱ्या प्रताप चौधरी या तरूणाची काही दिवसांपूर्वी हत्या झाली होती. या घटनेनंतर परिसरात मोठा संताप व्यक्त झाला होता. परिसरातील रहिवाशांनी या बंगल्याच्या बांधकामाची चौकशी करून कारवाईची मागणी केली होती.

     प्रताप चौधरी याने सदर बंगल्याच्या अनधिकृत बांधकामाविरोधात सातत्याने आवाज उठवला होता. त्याच्या तक्रारीनंतरही कारवाई न झाल्याने वाद वाढला होता. त्याच्या मृत्यूनंतर प्रशासनावर दबाव वाढला आणि केडीएमसीने तातडीने पाहणी करून कारवाई सुरू केली. गुरूवारी अनधिकृत भागावर हातोडा चालवत बंगल्यावरील अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईमुळे खंबाळपाडा परिसरातील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. एकीकडे अनधिकृत बांधकामांविरोधात कठोर भूमिका घेणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांकडून उमटत आहे. तर दुसरीकडे या प्रकरणातील इतर पैलूंची चौकशी पोलिसांकडून अद्याप सुरू आहे.


याच बांधकामावरून घडले हत्याकांड

मंगळवारी २६ मे रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास खंबाळपाड्यात भयंकर घटना घडली होती. प्रताप चौधरी (३२) याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही हत्या शेजारी राहणाऱ्या रोहित शेलार (२६) याने केली होती. शेलार कुटुंबियांकडून सुरू असलेल्या बंगल्याच्या बांधकामाबद्दल प्रताप चौधरी याने केडीएमसीकडे तक्रारींद्वारे तगादा लावला होता. आपल्या घराबद्दल तक्रार करतो म्हणून रोहित शेलार खवळला होता. घर बांधकामाच्या वादातून प्रतापचा खून करुन रोहित पसार झाला होता. टिळकनगर पोलिसांनी ३ दिवसांच्या शोध मोहिमेनंतर मोठ्या महत्प्रयासाने त्याला अटक केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT