नगरसेवक कुणाल पाटील pudhari photo
ठाणे

KDMC corporator extortion : शिंदे गटाच्या नगरसेवकाला 25 लाखांच्या खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी

परदेशातून आलेल्या फोन कॉलने राजकीय वर्तुळात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. केडीएमसीतील शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक कुणाल पाटील यांना परदेशातून आलेल्या फोन कॉलद्वारे 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

खंडणीची रक्कम न दिल्यास कुणाल पाटीलसह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कुणाल पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

नगरसेवक कुणाल पाटील यांना एका परदेशी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचा संबंध ‘एच.पी.पुजारी उर्फ अण्णा’ या नावाने सांगितल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीने पाटील यांच्याकडे 25 लाख रुपयांची मागणी केली आहे. या फोन संभाषणादरम्यान पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, तसेच कुणाल पाटील आणि त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आला आहे. या संपूर्ण संभाषणाचा ऑडिओ कॉल रेकॉर्डिंगही समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खलबल उडाली असून या प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.

कल्याण-डोंबिवलीच्या राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या नगरसेवकाला खंडणीची मागणी आणि कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. विशेष म्हणजे फोन परदेशातून आल्याचे सांगण्यात येत असल्याने, हा कॉल नेमका कुठून करण्यात आला, त्यामागे कोण आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीचा स्थानिक गुन्हेगारी नेटवर्कशी काही संबंध आहे का, याचा तपास पोलिसांसमोर महत्त्वाचा आव्हान ठरणार आहे.

मानपाडा पोलिसांनी या तक्रारीची नोंद घेतल्यानंतर फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे. फोनचा क्रमांक, कॉलचे तांत्रिक तपशील, ऑडिओ रेकॉर्डिंग, पैशांची मागणी आणि धमकी याची पडताळणी तपास यंत्रणेकडून केली जाण्याची शक्यता आहे. परदेशातून आलेल्या कॉलमागे प्रत्यक्षात कोण आहे? ‘एच.पी.पुजारी उर्फ अण्णा हे नाव वापरणारी व्यक्ती कोण आहे? 25 लाखांची मागणी का करण्यात आली? धमकी देणाऱ्या व्यक्तीला कुणाल पाटील यांच्याबाबत माहिती कशी मिळाली? या प्रकरणामागे स्थानिक किंवा परदेशातील गुन्हेगारी संपर्क आहे का? असे अनेक प्रश्न या घटनेमुळे उपस्थित झाले आहेत.

समोर आलेल्या ऑडिओ कॉलमध्ये नेमके काय संभाषण झाले, त्यातील आवाज कोणाचा आहे आणि रेकॉर्डिंगमध्ये फेरफार करण्यात आला आहे का? याची तांत्रिक तपासणी तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तसेच संबंधित फोन क्रमांकाचे तांत्रिक लोकेशन, कॉलचा स्रोत आणि त्यामागील व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT