कल्याण-डोंबिवली महापालिकेतील कंपनी विरुद्ध मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. महानगरपालिकेतील कंत्राटी पद्धतीवर काम करणार्या सुमारे 700 सफाई कामगारांना घरी बसवण्यात आले असून, त्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आवाज उठवला आहे.
कल्याण डोंबिवली महापालिकेने चेन्नई पॅटर्नवर आधारित कंपनीला व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवली असली, तरी या नव्या यंत्रणेमुळे अनेक जुन्या कामगारांच्या रोजगारीवर गदा आली आहे. यावर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त करत जुन्या कामगारांना पुन्हा कामावर घेतल्याशिवाय कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही, असा स्पष्ट इशारा दिला आहे.
बुधवारी सकाळी मनसेच्या नेतृत्वात शेकडो सफाई कामगारांनी महापालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. यावेळी हातात मागणीचे फलक आणि प्रचंड असंतोष दिसून आला. कामावरून कमी केलेल्या अनेक कामगारांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याने, मनसेने या लढ्याची धुरा उचलत कामगारांवरील अन्याय सहन केला जाणार नसल्याचा अंतिम इशारा दिला आहे. तरी आधीपासून काम करणार्या कामगारांकडे दुर्लक्ष केल्याने संताप निर्माण झाला आहे.
दरम्यान कंपनीने जुन्या कामगारांचा प्रश्न मार्गी लावून नंतरच नवीन कामगारांची भरती प्रक्रिया सुरू करावी, अन्यथा कल्याण डोंबिवली महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनावर देण्यात आलेल्या कंपनीचा ठेका चालू देणार नसल्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला. तर, या मोर्चाला साध्यात घेऊ नका तत्काळ जुन्या कामगारांच्या प्रश्न मार्गी लावा अन्यथा मनसे आपल्या स्टाईलने उतरेल, असा इशारा देखील भोईर यांनी स्पष्ट शब्दात दिला आहे.