कल्याण/डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल यांनी फूटपाथसह रस्ते बळकावणार्या बेशिस्त फेरीवाल्यांना वठणीवर आणण्याचे सर्व प्रभाग क्षेत्र अधिकार्यांना फर्मान सोडले आहे. कल्याणात मात्र बेशिस्त फेरीवाल्यांवर कारवाई करताना क प्रभागाच्या फेरीवाला कारवाई पथकाला धक्काबुक्की केली होती. दहशत माजविणार्या उन्मत्त फेरीवाल्यांना केडीएमसीने चांगलाच इंगा दाखवला आहे. या फेरीवाल्यांच्या विरोधात महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रेल्वे स्थानकाकडे जाणारा रस्ता नेहमीच गर्दीने गजबजलेला असतो. या रस्त्यावरून जाणार्या पादचार्यांना चालणे अथवा आपल्या वाहनाने रेल्वे स्थानक गाठणे सुलभ व्हावे याकरिता वर्दळीच्या या रस्त्यावरील फेरीवाल्यांवर महापालिकेच्या क प्रभागाचे फेरीवाला पथक सातत्याने कारवाई करत असते.
शुक्रवारी सायंकाळी देखील हा रस्ता वाहतुकीला मोकळा राहण्याच्या दृष्टिकोनातून क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि त्यांच्या पथकाने या रस्त्यावरील फेरीवाल्यांविरोधात कारवाईला सुरुवात केली. त्यावेळी संतापलेल्या फेरीवाल्यांनी सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात आणि त्यांच्या फेरीवाला कारवाई पथकातील कर्मचार्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.
या घटनेनंतर अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात जाऊन सरकारी कामात अडथळा निर्माण करणार्या फेरीवाल्यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून सार्वजनिक ठिकाणी सरकारी अधिकारी व कर्मचार्यांवर दहशत माजविणार्या मस्तवाल फेरीवाल्यांचा शोध सुरू केला आहे.