ठाणे : ठाण्याच्या कासारवडवलीत पंधरा वर्षीय मुलीचा ओढणीने गळा आवळून खून करणार्या 40 वर्षीय रिक्षाचालकास ठाणे गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. समाधान अर्जुन सूर्यवंशी (रा. सुखशांती चाळ, लोकमान्य नगर, ठाणे) असे अटक त्याचे नाव आहे.
आरोपीने मुलीचा खून कोणत्या कारणातून केला याचा अद्याप उलगडा झालेला नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास सिंडोबा मंदिर रोडकडे जाणार्या रस्त्यालगत एका मोकळ्या जागेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता.
मुलीच्या गळ्याला ओढणी घट्ट आवळून गुंडाळलेली असल्याने तिचा खून करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर कासारवडवली पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान, या गुन्ह्याचा समांतर तपास कासारवडवली पोलीस व गुन्हे शाखेचे पथक करीत होते. पोलीस तपासात मृत मुलीचे वय 15 ते 17 वर्ष, रंग काळा सावळा, उंची अंदाजे चार फूट, हातामध्ये बांगडी, अंगावर हिरव्या रंगाची सलवार कुर्ता असे वर्णन आढळून आले.
दरम्यान, याच वयाची व वर्णनाची एक मुलगी कळव्यातून मिसिंग झाल्याची तक्रार कळवा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आल्याचे समोर आले. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट पाचच्या पथकाने मिसिंग मुलीच्या घराजवळील व कळवा रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सदर मुलगी कळवा येथून ठाणे स्थानकावर उतरून तेथून एका रिक्षात बसल्याचे दिसून आले.
पोलिसांनी सदर रिक्षाचा शोध घेऊन रिक्षाचालकास ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्यानेच मुलीचा ओढणीने गळा आवळून खून केल्याची माहिती तपासात समोर आली. पोलिसांनी रिक्षाचालक समाधान अर्जुन सूर्यवंशी (40) यास अटक केली आहे. त्याला न्यायालयाने 17 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कळव्यात राहणारी 15 वर्षीय मुलगी 4 जुलै रोजी दुपारी घर सोडून निघून गेली होती. ती ठाणे स्थानकावर आल्यानंतर तेथून ती एका रिक्षात बसली. रिक्षा चालकाने या मुलीस रिक्षातून मानपाडा, भिवंडी असे फिरवत कासारवडवली येथे आणले व तिथे निर्जन ठिकाणी तिचा ओढणीने गळा आवळून खून केला. आरोपीने मुलीचा खून कोणत्या कारणातून केला याचा तपास पोलीस करीत आहेत. या घटनेत शारीरिक अत्याचार सारखा प्रकार घडला आहे का याचा देखील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.