कसारा : मुंबई नाशिक महामार्गवरील जुन्या कसारा घाटात कंटेनर ट्रेलरच्या अपघातामुळे कसारा घाट सहा तास ठप्प झाला होता.
बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास कसारा घाटातील एका वळणावर ट्रेलर ट्रक बंद पडला. याच दरम्यान पहाटे 5 च्या दरम्यान एक महाकाय कंटेनर नाशिक दिशेकडे जात असता पुढे बंद पडलेल्या ट्रेलरचा अंदाज न आल्याने तो कंटेनर ट्रेलरवर जाऊन आदळला व मागून धडकलेला कंटेनर महामार्गांवर आडवा झाला. यामुळे नाशिककडे जाणारा मार्ग पूर्ण बंद झाल्याने मुंबईहून नाशिककडे जाणारी वाहने कसारा घाटात अडकून पडली.
पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातामुळे नाशिककडे जाणारी वाहतूक पूर्ण पणे ठप्प झाल्याने पहाटे पाच वाजेपर्यंत पासून कसारा घाटातील अडकलेल्या वाहनांच्या रांगा 4 किलोमीटर पर्यंत गेल्यावर होत्या.
कसारा घाटातील आपघातग्रस्त वाहने बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत करण्यासाठी कसारा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सागर जाधव, महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन सदस्य, टोल पेट्रोलिंग टीम यांनी सकाळी घटनास्थळी धाव घेत सकाळी 9 वा. विरुद्ध दिशेने आणलेल्या 3 क्रेनच्या मदतीने 3 तासांच्या अथक परिश्रमानंतर आपघातग्रस्त दोन्ही अवजड वाहने बाजूला करून तब्ब्ल सहा तासानंतर जुन्या कसारा घाटातून एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली.
या वाहतूक जाममुळे अडकलेल्या शेकडो प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. एसटी बससह छोट्या कार देखील या वाहतूक कोंडीत अडकल्याने छोटे मुले, वयोवृद्ध व महिलांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.
दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास जुन्या कसारा घाटात लोखंडी प्लेट घेऊन जाणारा ट्रेलर ट्रक तत्काळ बाजूला केला असता किंवा त्या ट्रेलरच्या भोवती टोल प्रशासनाने सेफ्टी कोन लावून सुरक्षितता बाळगली असती तर आज अपघात झाला नसता व सहा तास प्रवासी व वाहन चालक अडकले नसते.
दरम्यान एकीकडे पाऊस व दाट धुके दोन्ही घाटात असल्याने मदत कार्यात अडथळे येत होते. जुन्या घाटातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांनी हलकी वाहने नाशिक मुंबई लेनवरील नवीन कसारा घाटातून वळविण्यात आली; परंतु घाटात दाट धुके असल्यामुळे वाहतूक सुरळीत करण्यासाठी अडचणी येत होत्या.
दरम्यान कसारा घाटात अवजड वाहनांचा कायम अपघात होत असतो परंतु अवजड वाहने बंद पडलेली असोत किंवा अपघातग्रस्त असोत, ती वाहने महामार्गावरून बाजूला घेण्यासाठी टोल प्रशासनाकडे असलेले क्रेन हे कमी क्षमतेचे असल्यामुळे कुचकामी ठरत आहेत.