कसारा : मुंबई नाशिक महामार्गावरील कसारा घाट दोन टप्प्यात बंद राहणार असून आज सोमवारपासून दि.24 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6 पर्यंत बंद करण्यात आला आहे.
पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी जुना कसारा घाट बंद असणार असून या कालावधीत नाशिक मुंबई महामार्गावरून नवीन कसारा घाटातून वाहतूक वळविली आहे. दरम्यान या मार्गावरून अवजड वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली असून ओडिसीसारखी अवजड वाहने मुंबई पुणे एक्सप्रेस-वे च्या मार्गे वळविण्यात आली आहे.
सोमवार (दि.24) सकाळी दहा पासून रस्ते दुरुस्ती कामास सुरुवात करण्यात आली असून प्रवाशांच्या व वाहुतुकदाराच्या सुरक्षेसाठी कसारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सुरेश गावित, महामार्ग पोलीस केंद्राचे अधिकारी छाया कांबळे, राम होंडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. आपत्कालीन घटनेमध्ये मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य मदतीला कार्यरत आहेत.
दरम्यान या ट्राफिक ब्लॉक मुळे जव्हार मोखाडा या दिशेने येणारी वाहतूक घाटणदेवी मंदिर मार्गे नवीन कसारा घाटातून वळविण्यात येणार असल्याची माहिती महामार्ग पोलिसांनी दिली आहे. तर नाशिक कडे जाताना नवीन घाटातून वाहनांचा वेग नियंत्रणात ठेवत प्रवास करावा तसेच कोण्हीही ओव्हरटेक करू नये असे आवाहन पोलिसांनी केले असून कसारा पोलीस व महामार्ग पोलीस गस्त करीत आहेत.