माऊली pudhari photo
ठाणे

माऊली

कर्मे पुनर्जन्मास कारणीभूत ठरतात !!! संचित भोगायला !!!

पुढारी वृत्तसेवा

कृष्णा जाधव - मुद्रांक जिल्हाधिकारी, मुंबई

देह अहंकार हाच जीवाला ‌‘जीवात्मा‌’ विसरायला लावतो. जीव देहाच्या ठायी रममाण होत आपले मूळ अस्तित्व विसरतो; किंबहुना तो देहालाच ‌‘मी‌’ आहे असे समजून कर्म करत राहतो. जीवाचे हे जीवात्म्याशी दुरावणं आपणास खूप महागात पडते. जीव हा शरीराला ‌‘मी‌’ आहे असे समजून त्याच्याभोवती निर्माण झालेल्या काल्पनिक नात्यागोत्यांच्या मोहजंजाळात अडकतो. त्यालाच ‌‘जीवलोक किंवा संसार‌’ म्हणतात. या जीवलोकातील कर्माच्या प्रक्रियेतून निर्माण होणारे संचित जीवाला जन्म-मरणाच्या चक्रात अडकवते. आत्मा आणि जीव यामधील संबंधावर आपण गतलेखात चिंतन केले. आजच्या लेखात प्रकृती आणि आत्मा यावर प्रकाश टाकूयात.

॥ श्री ॥

पंचमहाभुते आणि इंद्रिये यांच्या संयोगाने निर्माण होणारी प्रकृती. प्रकृती आणि आत्मा यांच्या संयोगाने निर्माण होणारे जीवन. यामधील परस्पर विसंवाद हाच जीवाला आत्मज्ञानापासून दूर घेऊ न जातो. यातील ‌‘संवाद‌’ हा आत्मज्ञानास कारणीभूत ठरतो. एवढं हे सोपं ‌‘तत्त्व‌’ समजायला आयुष्यातील वर्षानुवर्षे खर्ची घालावी लागतात. ती आत्मसात करायला कित्येक वेळा जन्म घ्यावा लागतो आणि ती अनुभवायला जन्मोजन्मीची पुण्यायी फळास यावी लागते.

किंबहुना आत्मा चोखटु| होऊनि प्रकृतीसी एकवटु|

बांधे प्रकृतीधर्माचा पाटु| आपणपया॥

‌‘प्रकृती‌’ हा शब्द केवळ निसर्ग किंवा भौतिक जग एवढाच अर्थ देत नाही, तर तो सृष्टीचा आधार आणि गुणत्रयीचा (रज-तम सत्व) स्त्रोत मानला जातो. सांख्य तत्त्वज्ञानानुवार प्रकृती ही मूळ ‌‘कारणशक्ती‌’ जी अव्यक्त रूपात असते तीच व्यक्त होऊन जग निर्माण करते. प्रकृतीतच रज-तम-सत्व गुण संतुलनात असतात. श्रीमद्‌‍ भगवत्‌‍गीतेत भगवान श्रीकृष्ण अष्टधा प्रकृती जिला ‌‘अपरा‌’ शक्ती आहे. ती पंचमहाभुते आणि मन, बुद्धी आणि अहंकारापासून तयार होते असे सांगतात. ‌‘आत्मा‌’ अर्थात भगवंताचा ‌‘अंश‌’ किंवा त्यास ‌‘पुरुष‌’ असेही अध्यात्मात संबोधतात.

Also read:माऊली

आत्मा किंवा पुरुष हा ‌‘साक्षी‌’ आहे. तो केवळ पाहतो, स्वतः काही करत नाही, ‌‘प्रकृती‌’ ही कर्ता आहे. ती निर्माण, पालन, संहार करते. जेव्हा पुरुष प्रकृतीशी तादात्म्य पावतो तेव्हा ‌‘अहंकार‌’ निर्माण होतो, आणि जीव बंधनात अडकतो हेच वरील ओवीत माऊलींनी स्पष्ट केले आहे. प्रकृती म्हणजे ‌‘माया‌’ जी परमात्म्याच्या इच्छेने खेळ खेळते. या प्रकृतीच्या अधीन राहून जीव संसारचक्रात फिरतो. जीवात्मा आपल्या मूळ बह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळे संसार बंधनात अडकतो आपणच प्रकृतीरूप आहोत असे मानतो. शरीराला धारण करून जीव रस, रूप, शब्द, स्पर्श आणि गंध यांचे अनंत विषयांचे सेवन करण्यात स्वत:ला धन्यता मानतो. विषयांचे समुदाय इंद्रीयांद्वारे भोगण्याचे कार्य जीवात्मा करत जातो आणि स्वत्व अर्थात आत्मज्ञान हरपतो.

तैसा आपुलिया विस्मृती| आत्मा आपणचि प्रकृती|

सारखा गमोनि पुढती| तियेसीची भजे॥

जीव हा आत्मा आणि प्रकृती यांच्यापासून स्वत:ला ओळखण्याची चूक करत चाललेला असतो. जीवाचं मूळ स्वरूप आत्मस्वरूप आहे ना की, प्रकृती स्वरूप. पण प्रकृती जीवाला स्व-स्वरूप विसरायला भाग पाडते. ती जीवाला रस-रूप-रंग-स्पर्श-गंध यांच्या मोहात पाडते. ‌‘मन‌’ हे वरील पाच भोगांना इंद्रियांकरवी भोग घेण्यास भाग पाडते. ‌‘लाचावले मन, लागलीसे गोडी, ते जीवे न सोडी, ऐसे झाले‌’ संत जगद्गुरु तुकोबारायांचा हा अभंग भगवंत दर्शनाप्रती मनाला लागलेल्या गोडीचा आहे. ‌‘मन‌’ हे चांगल्या विषयांकडे आकर्षित करण्यासाठी ‌‘संतकृपा‌’ असावीच लागते, नाहीतर मग संत बहिणाबाई म्हणतात,

मन वढाय वढाय, त्याचं न्यारं रे तंतर

अरं ईचु साप बरा, त्याले उतार मंतर ॥

असो ! मनाने इंद्रियांकरवी जे कर्मे करून घेतली जातात, ती रज-तम-सत्व गुणांकित असतात, त्याद्वारे कर्मफळांची निर्मिती होत असते. ही कर्मफळे देहामार्फत भोगावी लागतातच, लागतात. माऊली ओवींमधून फार छान रचना करतात -

तेवी मनःषष्ठा यया | इंद्रियाते धनंजया|

देहराजुने, देहा | पासुनी गेला ॥

मन आणि शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध यांच्या माध्यमातून जी कर्मे केली जातात ती पुनर्जन्मास कारणीभूत ठरतात. संचिताप्रमाणे इहलोकात किंवा स्वर्गलोकात देह प्राप्त होतो. पुण्य केले असेल, तर स्वर्गलोकात जन्म घेऊ न पुण्याचा पुन्हा वरील सहा इंद्रियांकरवी उपभोग घेऊ न पुण्य संपेपर्यंत तेथे वास. पुण्य संपताक्षणी स्वर्गीचा देह टाकून मृत्यू लोकात जन्म. ‌‘पाप‌’ केले असेल तर इहलोकात जन्म घेऊन पापाचे प्रायश्चित म्हणून दुःखांचा उपभोग घेऊन पाप संपवावे लागते व पुन्हा त्या जन्माच्या वेळी जे कर्म हातून घडली त्यातून निर्माण होणारी कर्मफळे भोगण्यासाठी जन्म घ्यावा लागतो, हे जन्म आणि मृत्यूचं रहाटगाडगं चालूच राहतं. विषयांचा उपभोग घेणे हे प्रकृतीचे कार्य आहे. ‌‘आत्म्याचे‌’ नाही. देह सोडून जात असताना अथवा पहिल्या देहात राहात असताना, विषयभोग अथवा सुख-दुःखादी भोग भोगणारा जीव, त्याचे सत्‌‍स्वरूप, आत्मस्वरूपु हे फक्त ज्ञानीयास दिसते. ‌‘भोगी‌’ किंवा ‌‘संत‌’ आपल्या ठिकाणी असलेल्या आत्मस्वरूपास पाहू शकतात.

अविचारी किंवा अज्ञानी लोक जीवाचे खरे स्वरूप पाहू शकत नाहीत. देहाचं जन्म घेणं, मृत्यू पावणं हे कर्मकळांचा परिपाक आहे. आत्मा हा प्रकृतीपेक्षा वेगळा आहे. ‌‘जीव‌’ प्रकृतीच्या खेळात अडकून जन्म-मृत्यूच्या बंधनात बांधला जातो. जन्म-पालन-नाश हे प्रकृतीचे गुणधर्म आहेत. आत्म्याचे नाहीत - हे ज्याला समजते तो ‌‘आत्मज्ञानापर्यंत‌’ पोहोचतो. आत्मसत्ता हीच खरी भगवंताची सत्ता. या सत्तेला पादाक्रांत करणारे योगी किंवा सत्‌‍पुरुष संत श्रेष्ठ असतात. विवेकाच्या विस्ताराने ज्याने ‌‘ज्ञान‌’ आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थीर झाले आहे, हे जाणतो तो ज्ञानी सत्पुरुष ‌‘आत्मा‌’ अकर्ता आहे, असे जाणतो.

तैसे विवेकाचेनि पैसे|

जयाची स्फूर्ती स्वरूपी बैसे|

ते ज्ञानिये देखती ऐसें| आत्मयाते॥

रामकृष्णहरी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT