ठाणे

Thane | कल्याणकर तरुणाच्या हत्येचा २४ तासांत छडा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील १०० फुटी रोडला मंगळवारी रात्रीच्या सुमारास पाच जणांनी मिळून एका २६ वर्षीय वर्षाच्या तरूणाचा भर रस्त्यावर धारदार शस्त्रांनी खात्मा केला होता. या हत्येचा क्राईम बॅचच्या कल्याण युनिटने २४ तासांत मोठ्या कौशल्याने उलगडा केला. या हत्याकांडातील दोघा मुख्य मारेकऱ्यांना क्राईम ब्रचने इगतपुरी रेल्वे स्टेशनवर सापळा लावून जेरबंद केले. साहिल नासिर शेख उर्फ साहिल (२१, रा. मरियम बी चाळ, जगदीश डेअरी मागे, वालधुनी, अशोकनगर, कल्याण) आणि विद्यासागर तुलसीधरन मुर्तील उर्फ अण्णा (२१, रा. एकविरा सोसायटी, फिफ्टी डाव्यामागे, पिसवली) अशी अटक करण्यात आलेल्या खून्यांची नावे आहेत.

कल्याण-मलंगगड रोडला संदीप नंदू राठोड (२६, रा. मलंगगड रोड कल्याण-पूर्व) याची पाच जणांनी मिळून हत्या केली होती. या प्रकरणी प्रेम विनोद चव्हाण यांच्या फिर्यादीवरून कोळसेवाडी पोलिस ठाण्यात बीएनएस २०२३ चे कलम १०३ (१), १८९ (२), १९१ (२), १९१ (३), १९० महाराष्ट्र पोलिस कायद्याचे कलम ३७ (१), (३), १३५ सह शस्त्र अधिनियम ४, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडात साहिल शेख उर्फ साहिल आणि विद्यासागर मुर्तील उर्फ अण्णा यांच्यासह अन्य तीन साथीदारांनी चॉपर आणि धारदार लोखंडी शखांचा वापर केला होता.

या गुन्ह्याचा स्थानिक कोळ- सेवाडी पोलिसांसह क्राईम ब्रचच्या कल्याण युनिटने समांतर तपास सुरू केला होता. घटनास्थळावरील प्राप्त सीसीटीव्ही फुटेजसह खासगी गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सदीप चव्हाण, संतोष उगलमुगले, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, गुरूनाथ जरग यांच्यासह दीपक महाजन, अनुप कामत, अमोल बोरकर, गोरखनाथ पोटे, प्रशांत वानखेडे, मिथुन राठोड, सचीन वानखेडे, रमाकांत पाटील, रविंद्र लांडगे, विलास कडू या पथकाने इगतपुरी रेल्वे स्टेशनवर सापळा लावला होता. या सापळ्यात साहिल शेख उर्फ साहिल आणि विद्यासागर मुर्तील उर्फ अण्णा अलगद अडकले.

संदीप राठोडची हत्या पूर्ववैमनस्यातून

चौकशी दरम्यान या दोघांनी अन्य तिघांच्या मदतीने संदीप राठोड याची धारदार शत्रांनी खांडोळी करून ढगात धाडले. यापूर्वी संदीप आणि मारेकऱ्यांमध्ये वाद झाला होता. या वादातून संदीपची हत्या केल्याची कबुली क्राईम ब्रेचला दिली. या दोघा खुन्यांना कोळसेवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. या दोघांच्या अटकेनंतर अन्य तिघा फरार मारेकऱ्यांना हुडकून काढण्याचा मार्ग सुकर झाला आहे. कोळसेवाडी पोलिस भूमिगत तिघांचा शोध घेत आहेत.

SCROLL FOR NEXT