डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडील रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या घुटमळणाऱ्या बांग्लादेशी ६ घुसखोर महिलांना महात्मा फुले चौक पोलिसांनी अटक केली. या महिलांनी दिलेल्या माहितीनुसार एका पुरूष बांग्लादेशीला देखिल अटक करण्यात आली आहे. या सातही बांग्लादेशींकडे त्यांच्या देशात राहण्याचे पुरावे सापडले असून लवकरच या सातही घुसखोरांना त्यांच्या मायदेशी पाठविण्यासाठी पोलिसांनी कायदेशीर कार्यवाही सुरू केली आहे.
शिपा बलून पठाण (२७, रा. उत्तर कन्यायदेशी ठाणा कमलगंज, जिल्हा-मल्लवी बाजार), शर्मिन मोने रूल इस्लाम (२०, रा. बोरीसार, ठाणा शोरूम कटी, जिल्हा-पिरजपूर), रिमा सागर अहमद (२९, रा. हरळी गाव गोदाबाग ठाणा जिंजीरा विभाग ढाका), सुमया अबुल कासिम (२०, रा. नवागाव ठाणा रूगंज, विभाग कांचन जिल्हा-नांदगंज), पौर्णिमा मोहम्मद सुलेमान अख्तर (१९, रा. ग्रामपंचायत ठाणा सदर, जिल्हा-फेनी) जोया जास्मिन मतदार (२५, रा. हणार गाजीपूर, ढाका) आणि रॉकी रहीम बादशाह (२७) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
चोर, लुटारू, गुंड, गुन्हेगार, अंमली पदार्थांचे तस्कर तथा खरेदी-विक्री करणाऱ्या बदमाशांची धरपकड करून अशांना तुरूंगाचा रस्ता दाखविण्याच्या जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी क्राइम ब्रँचसह सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.
या संदर्भात पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी आयुक्तांच्या सूचनांनुसार कारवायांना वेग दिला आहे. कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे आणि महात्मा फुले चौक पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बलरामसिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विजय नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक स्वप्नील भुजबळ, पोलिस उपनिरीक्षक जानूसिंग पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोलिंग दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या घुटमळणाऱ्या ६ महिलांना ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान त्यांच्याकडे भारतात राहण्याबाबतचा कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. या ६ महिलांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये ईमो ॲप व +८८ या सिरीयलने सुरू होणाऱ्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्स ॲपद्वारे चॅटींग व कॉलिंग केल्याचे आढळून आले. यातील काही महिलांकडे बांग्लादेशातील जन्म प्रमाणपत्र, बांग्लादेश नॅशनल आयडी कार्ड असल्याचेही पुरावे सापडले. पोलिसांच्या हाती बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास रॉकी बादशाह हा आणखी एक बांग्लादेशी घुसखोर हाती लागला. हा घुसखोर स्टेशन परिसरात संशयास्पदरित्या फिरत होता. त्याच्याकडे बांग्लादेशातील जन्म प्रमाणपत्र आढळून आले. या सातही घुसखोरांनी बांग्लादेशातून छुप्या मार्गाने भारतामध्ये प्रवेश करून तेथून ट्रेनने मुंबईला आल्याची कबूली दिल्याचे कल्याण विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त कल्याणजी घेटे यांनी सांगितले.