डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, सहयोग सामाजिक संस्था आणि रोटरी क्लब ऑफ कल्याण टायगर या सेवाभावी संस्थांच्या संयुक्त विद्यमाने माणुसकीची भिंत आणि निरुपयोगी वस्तू संकलन या उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमाचे उद्घाटन महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या हस्ते पार पडले.
कार्यक्रमास ड प्रभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश यमगर, जे प्रभागाचे सहाय्यक आयुक्त सविता हिले, रोटरी संस्थेचे अध्यक्ष भूषण कोटावडे, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, जाणिव सामाजिक संस्थेच्या अनिता पाटील, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांनी उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, माणुसकीची भिंत आणि निरुपयोगी वस्तू संकलन हे दोन्ही उपक्रम प्रत्येक प्रभागात उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमातून समाजातील गरजू घटकांना मोठा आधार मिळेल व नागरिकांचा सहभागही वाढेल, असा विश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सहयोग संस्थेचे अध्यक्ष विजय भोसले यांनी केले. कालिदास कदम, विभागीय अधिकारी मितेश कळंबे, रोटरी संस्थेचे सदस्य विरेन सक्सेना, संदिप चौधरी, राकेश झांजे, भारत साताळे तसेच सुमित संस्थेचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजदानयज्ञ सातत्याने सुरू राहणार
जुन्या पण सुस्थितीत असलेल्या वस्तू या भिंतीवर ठेवाव्यात आणि गोरगरिबांचा दुवा घ्यावा, या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी वस्तू आणून ठेवल्या आहेत. हा समाजदानयज्ञ सातत्याने सुरू राहणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या वापरात नसलेल्या वस्तू समाजातील गरजूंपर्यंत पोहोचविण्याची सामाजिक चळवळ सुरू झाली आहे. या चळवळीत नागरिकांनी सहभागी व्हावे, अशी अपेक्षा सहयोग संस्थेचे संचालक विजय भोसले यांनी व्यक्त केली.