डोंबिवली : वाहतूक पोलीस कर्तव्यावर असतनाच कारमध्ये असलेल्या त्रिकुट हल्लेखोरांनी वर्दी फाटे पर्यत वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करत जीवघेणा हल्ला केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना कल्याण पश्चिम भागातील दुर्गाडी चौकात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तीन हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी हल्लेखोर त्रिकुटाचा तपास सुरु केला आहे. विलास सुरेश भागीत (33) असे जखमी वाहतूक पोलिसाचे नाव आहे.
विशेष म्हणजे हल्लेखोर हे वाहतूक नियमाचे उल्लंघन करून वाहतूक कोंडीत विरुद्ध दिशेन कार ने येत होते. यावरून भागीत यांनी हल्लेखोरांना थांविण्याचा प्रयत्न केला असता, याच गोष्टीचा राग येऊन त्या हल्लेखोरांनी भर चौकात वर्दी फाटेपर्यत बेदम मारहाण केली आहे. तर दुसरीकडे भर चौकात पोलिसांवर जीवघेणा हल्ला झाल्याने पोलिस दलात एकच खळबळ माजली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांना वर्दीचा धाक राहिला नसल्याचे दिसून आले आहे. तर हे हल्लेखोर सत्ताधारी पक्षाचे कार्यकर्ते असल्याचे तपासात समोर आले असून या तिघांच्या अटकेवरून पोलिसांवर दबाव येत असल्याचे सांगण्यात येते.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार विलास सुरेश भागीत हे सहा महिन्यापासून शहर वाहतुक शाखा, कल्याण येथे कार्यरत असून ते शनिवारी रात्रीच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील दुर्गाडी चौकात वाहतुक नियमन करण्याकरिता हवालदार पी. पी. गायकवाड आणि ट्रॅफिक वॉर्डन प्रतिक पवार यांच्यासोबत कर्तव्यावर होते. याच वेळी रात्रीच्या १० वाजता कोनगावाकडून येणाऱ्या लाईनवर ट्राफिक जाम झाले होते. यावेळी वाडेघर चौकाकडून येणारी एम एच 05 /सी ए /0400 मेटॅलिक सिल्व्हर गोल्ड रंगाची कार (इनोव्हा) दुर्गाडी चौकाकडून वाडेघर चौकाकडे विरूद्ध दिशेने येत दुर्गामाता चौकातून कोनगावच्या विरूद्ध दिशेने जात होती.
आधीच वाहतूक कोंडी चौकात झाल्याने सदर कार थांबवून विरूद्ध दिशेने जाण्यास हवालदार भागीत यांनी मनाई केली. या गोष्टीचा राग येऊन कार चालक अनोळखी वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व त्यासोबत असलेले इतर 2 इसम, त्यातील एकजण अंदाजे 25 ते 30 वर्षे, अंगात गुलाबी रंगाचा गोल गळ्याचा टी-शर्ट वय अंदाजे 25 ते 30 वर्षे, दुसरा अंगात गोल गळ्याचा पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट या तिघांनी गाडीचे खाली उतरून शिवीगाळी करून आम्हाला का अडवतोस ? असे बोलून आरडाओरड करून तिन्हीही इसमांनी शिवीगाळ केली. त्यावेळी कार चालकाने पाठीमागून पकडून धरले व गुलाबी टी-शर्ट घातलेल्या इसमाने बेदम मारहाण केली.
तसेच पांढऱ्या रंगाच्या गोल गळ्याचा टी-शर्ट घातलेल्या इसमाने कॉलर पकडून शर्टचे बटण तोडून वर्दी फाडून छाती आणि पोटावर बुक्यांनी बेदम मारहाण केली. त्यानंतर हल्लेखोरांनी तेथून कारसह पळ काढला.
सद्या कल्याणच्या फोर्टीस हॉस्पीटलमध्ये हवालदार भागीत यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती वारिष्ठ पोलिस निरीक्षक शंकरसिंग गौड यांनी दिली. दुसरीकडे हल्ल्याचे व्हिडीओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले असून या घटनेमुळ पोलिस दलात अस्वस्थता पसरली आहे.