डोंबिवली : मराठी बोलता येत नाही का ? मराठीत बोलायची लाज वाटते का ? अशा प्रश्नांची सरबत्ती करत लोकलमधील चार-पाच जणांच्या टोळक्याने केलेल्या मारझोडीमुळे कल्याणमध्ये राहणारा १९ वर्षीय कॉलेजचा विद्यार्थी तणावाखाली आला. घरी परतल्यानंतर या तरूणाने बेडरूमचे दार आतून बंद केले आणि सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन जिवनत्याग केला. या घटनेनंतर सदर तरूण राहत असलेल्या कल्याण पूर्वेतील तिसगांव नाक्यावर असलेल्या सहजिवन वसाहतीवर शोककळा पसरली आहे.
अर्णव जितेंद्र खैरे (१९) असे या तरूणाचे नाव असून तो मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये प्रथम वर्षात विज्ञान शाखेचा विद्यार्थी होता. अर्णवच्या मृत्यू प्रकरणी त्याचे वडील जितेंद्र खैरे यांनी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात जाऊन माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
मंगळवारी १८ नोव्हेंबर रोजी सकाळी नेहमीप्रमाणे अर्णव अंबरनाथ–सीएसटी लोकलने कॉलेजकडे निघाला. मात्र त्याच्यासाठी ती सकाळ शेवटची ठरली. फोनवरून वडिलांना सांगताना अर्णवने सांगितलेली हकिगत अंगावर काटा आणणारी होती. लोकलमध्ये गर्दी असल्यामुळे एका मुलाला तो थोडं पुढे व्हा असं म्हणाल्यावर त्या मुलाशी बोलण्यावरून किरकोळ वाद झाला आणि अचानक ४–५ जणांच्या टोळक्याने अर्णववर झडप घातली. त्या टोळक्याने अर्णवला विचारणा केली. तू मराठी बोलत नाहीस का ? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असे म्हणत त्या टोळक्याने अर्णवला ठोसा-बुक्क्यांनी मारहाण केली. अर्णवला मारहाण होत असताना लोकलमधील बघ्यांपैकी कुणीही मधे पडला नाही. हा सारा प्रकार अर्णवने त्याच्या वडिलांना फोन करून सांगितला. अर्णव हे सर्व अत्यंत भयभीत आणि भेदरलेल्या अवस्थेत सांगत होता.
मारहाणीच्या दहशतीमुळे अर्णव ठाणे स्थानकावर उतरला आणि मागील लोकल घेऊन मुलुंडला पोहोचला. त्याने पुन्हा वडिलांशी संवाद साधला. पप्पा, मला बरे वाटत नाही. आज सकाळी ट्रेनमध्ये मारहाण केली आहे. मी खूप घाबरलो आहे, असे सांगणाऱ्या अर्णवला वडिलांनी धीर देण्याचा प्रयत्न केला. पण मुलाच्या आवाजातील भीती आणि तणाव त्यांनी प्रकर्षाने जाणवत होती. सायंकाळी ७ वाजता घरी आल्यावर अर्णवने बेडरूमचा दरवाजा आतून बंद करून घेतला होता. वडील जितेंद्र खैरे यांनी आवाज दिल्यावरही काहीच उत्तर मिळाले नाही. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडल्यावर बेडरूममध्ये अर्णव ओढणीच्या साह्याने सिलींग फॅनला गळफास घेतलेल्या स्थितीत लटकताना आढळून आला. हे पाहून त्याला तात्काळ केडीएमसीच्या रूक्मिणीबाई रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
माझा मुलगा भाषिक वादाचा बळी - जितेंद्र खैरे यांचा आरोप
या संदर्भात जितेंद्र खैरे यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत स्पष्ट केले आहे. मराठी बोलत नाही म्हणून माझ्या मुलाला ट्रेनमध्ये मारहाण झाली. त्या भीतीपोटी मानसिक तणावातून त्याने आत्महत्या केली असावी. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून मला न्याय मिळावा, अशी मागणी खैरे यांनी केली आहे.
लोहमार्ग पोलिसांकडूनची तपास सुरू
मराठी विरूद्ध हिंदी भाषिकांच्या राजकारणामुळे अर्णव सारख्या निरागस तरूणाचा हकनाक बळी गेला आहे. राज्यात मराठी–हिंदी वादावरून सामाजिक तणाव वाढत आहे. भाषेच्या नावाखाली सामान्य नागरिक, विशेषतः तरूण मंडळी तणावाखाली असल्याचे अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणातून प्रकर्षाने जाणवत आहे. या घटनेची नोंद घेऊन कोळसेवाडी पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. अर्णवने आत्महत्या जरी घरी केली असली तरीही हा सारा प्रकार लोकलमध्ये घडल्याने लोहमार्ग पोलिसांनी देखिल चौकस तपास सुरू केला आहे.