कल्‍याणात स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस आदळली झाडावर Pudhari Photo
ठाणे

Kalyan ST Bus Accident | स्टेअरिंग रॉड तुटल्याने एसटी बस आदळली झाडावर : सुदैवाने मोठा अनर्थ टळला

कल्याण एसटी आगारातील बसेसच्या अपघाताचे सत्र सुरूच : ५ - ६ प्रवासी किरकोळ जखमी, तर वाहकाला मुकामार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण एसटी आगाराच्या बसेसच्या अपघातांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नाही. बसचे पुढचे चाक निखळून झालेल्या अपघाताला काही आठवडे उलटत नाहीत तोच रविवारी सकाळी पुन्हा एकदा बसचा स्टेअरिंग रॉड तुटून अपघाता झाला. यावेळीही बस झाडाला धडकल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला असला तरी एसटी प्रशासन मोठ्या जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहे का ? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

रविवारी सकाळी कल्याण आगाराची ही बस सुमारे २० ते २५ प्रवाशांना घेऊन माळशेज मार्गे आळेफाट्याकडे निघाली होती. मुरबाडच्या पुढे असलेल्या गावाजवळून ही बस जात असताना अचानक बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने ही बस थोडी पुढे जाऊन रस्त्यावरून खाली उतरली आणि शेजारच्या झुडपांमध्ये असलेल्या झाडाला जाऊन धडकली. या अपघातात बसच्या उजव्या भागाचे काही नुकसान झाले. बसमधील काही प्रवाशांना किरकोळ मार लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर वाहकालाही मुकामार लागल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सुदैवाने ही बस झाडाला धडकल्याने पुन्हा एकदा मोठा अपघात टळला. काही अंतरावर पुढे असलेल्या माळशेज घाटामध्ये हा अपघात घडला असता तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती. या अपघाताबाबत कल्याण एसटी आगाराचे व्यवस्थापक महेश भोये यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र तो होऊ शकला नाही.

देभभाल- दुरूस्तीवर प्रश्नचिन्ह

दरम्यान काही आठवड्यांपूर्वीही कल्याण एसटी आगाराच्या बसचे पुढचे चाक निखळून अपघात झाला होता. त्यापाठोपाठ रविवारी स्टेअरिंग रॉड तुटून झालेल्या अपघाताचा विचार करता कल्याण आगारातील बसेसच्या देभभाल/दुरूस्तीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. देखभाल- दुरूस्तीचे काम करूनही असे अपघात होत का आहेत ? की बसेसच्या दुरूस्तीच्या कामामध्ये काही तडजोड केली जात आहे का ? आणखी किती मोठा अपघात झाल्यावर की प्रवाशांचा बळी गेल्यावर एसटी प्रशासन जागे होणार आहे ? असे असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT