नेवाळी : अनेक प्रयोग करूनही कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी काही सुटलेली नाही. जागोजागी पडलेले खड्डे, अपूर्ण काँक्रीटीकरण आणि मेट्रोचे सुरू असलेले काम यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीत तासन्तास अडकावे लागत आहे. काटई नाका, निळजे चौक, मानपाडा, घारीवली परिसरात ही समस्या गंभीर आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, येथील वाहतूक कोंडीचे एकमेव कारण म्हणजे येथील रस्ताबाधितांना तिसर्या मार्गिकेचा न दिलेला मोबदला आहे. शासनाकडून हा मोबदला देण्याचे मान्य झाले असले तरी तशी मानसिकता अजूनही तयार झालेली नाही. त्यामुळे या रस्त्यामध्ये अभूतपूर्व अशी वाहतूक कोंडी सातत्याने होत आहे.
शासनाने तिसर्या मार्गिकेचा जमीनमालकांना मोबदला दिला असता तर या तिसर्या मार्गिकेतून काटई चौकातून कल्याण, डोंबिवली तसेच अंबरनाथ, बदलापूर दिशेने येणार्या-जाणार्या वाहनचालकांना या मार्गिकेचा उपयोग झाला असता. अस्तित्वातील 30 मीटर रस्ता असताना रस्ताबाधितांना मोबदला न दिल्यामुळे हा रस्ता 20 ते 22 मीटर रुंद झाल्याने प्रत्येक ठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.
कल्याण फाटा
डायघर चौक
निळजे चौक
काटई चौक
घारीवली चौक
मानगाव चौक
मानपाडा चौक
ललित काटा
सोनारपाडा
बाधितांना मोबदला हा आज ना उद्या मिळेलच, परंतु या कारणामुळे वाहन चालकांना तासन्तास या वाहतूक कोंडीत अडकून राहावे लागत आहे. मोबदल्याच्या विषयाच्या अनुषंगाने गणेशोत्सवानंतर लगेचच आम्ही पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेणार आहोत.गजानन पाटील, शेतकरी