डोंबिवली : कल्याणच्या ग्रामीण भागात वीजचोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून वीजचोरांचा सुळसुळाट सुरू असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहा वीजचोरांविरोधात कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात विद्युत कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या कारवाईत एकूण ३७ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आली असून महावितरणच्या भरारी पथकाने केलेल्या या कारवाईमुळे वीजचोरांचे धाबे दणाणले आहेत.
महावितरणच्या भरारी पथकाने कल्याण-मलंगगड रस्त्यावरील नांदिवली आणि कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी परिसरातील गृहसंकुलांमध्ये अचानक वीज मीटर तपासणी मोहीम राबवली. या तपासणीदरम्यान काही घरांमध्ये वीज मीटर नसताना सोसायटीच्या मुख्य मीटरला वळसा घालून (बायपास करून), तसेच थेट रस्त्यावरील विजेच्या खांबावरून तार टाकून वीज वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी तीन वीज वापरकर्ते आणि त्यांचे घरमालक अशा एकूण सहा जणांविरोधात महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
कल्याण पूर्वेतील महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता नरेंद्र मेंढे हे आपल्या पथकासह वीजचोरी शोधमोहिमेअंतर्गत मलंगगड परिसरातील नांदिवली येथील 'महेक रेसिडेन्सी'मधील प्रकाश डी. वाधवा यांच्या ‘एफ’ विंगमधील सदनिकेत पोहोचले. तेथे वाधवा यांच्या वतीने ग्राहक प्रतिनिधी म्हणून भाडेकरू/वापरकर्त्या आरती शक्तिनाथ सिंग उपस्थित होत्या. पथकाने सदनिकेच्या मीटरची तपासणी केली असता, मीटरला वळसा घालून भिंतीतून परस्पर थेट वीजपुरवठा घरात घेतल्याचे निदर्शनास आले. ही बाब पथकाने आरती सिंग यांच्या निदर्शनास आणून दिली. सदनिका मालक प्रकाश वाधवा यांच्या घराचा वापर करणाऱ्या आरती सिंग यांनी २९ जुलै २०२४ ते २९ जुलै २०२५ या कालावधीत १ हजार ८० युनिट्सची वीजचोरी करून महावितरणचे १७ हजार ८८० रुपयांचे आर्थिक नुकसान केले. तसेच थकीत देयकाचा भरणा न केल्याने अभियंता नरेंद्र मेंढे यांच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध विद्युत कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत साहाय्यक सुरक्षा अधिकारी प्रियंका महाजन, वरिष्ठ तंत्रज्ञ प्रकाश कोळी, समाधान देसले व पंच सहभागी झाले होते.
तसेच नरेंद्र मेंढे यांच्या पथकाने कल्याण-शिळ महामार्गावरील दावडी येथील महेश बाळकृष्ण खोरे यांच्या मालकीच्या सीताबाई रामचंद्र नगरमधील चाळीत तपासणी मोहीम राबवली. यावेळी तपासणी पथकाने एका खोलीची तपासणी केली असता, खोलीला मीटर नसताना थेट रस्त्यावरील खांबावरून तार जोडून वीज वापरली जात असल्याचे आढळले. वीजचोरी हा गुन्हा असल्याची जाणीव असतानाही घरमालक महेश खोरे आणि भाडेकरू शामजी यादव यांनी डिसेंबर २०२४ ते नोव्हेंबर २०२५ या काळात १९४ युनिट्सची वीजचोरी करून महावितरणचे ७ हजार ५२० रुपयांचे नुकसान केले.
याच चाळीतील रहिवासी अनिल सुंदरलाल पासवान यांच्या खोलीची तपासणी केली असता, तिथेही वीज मीटर नसून खांबावरून थेट वीज घेतली जात असल्याचे उघड झाले. त्यांनीही याच कालावधीत ११ हजार ७०५ रुपयांची वीजचोरी केल्याचे निष्पन्न झाले. महावितरणने वारंवार सूचित करूनही या दोन्ही भाडेकरूंनी दंडात्मक रकमेचा भरणा न केल्यामुळे त्यांच्याविरुद्ध विद्युत कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.