डोंबिवली : कल्याण तालुक्यातील रायते येथील एका जमीन खरेदी प्रकरणात जमीदार शेतकऱ्याकडून 40 हजार रूपयांची लाच घेताना येथील तहसीलदार कार्यालयातील एका महसूल सहाय्यकाला बुधवारी संध्याकाळी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. संतोष महादेव पाटील (46) असे लाच घेताना पकडलेल्या महसूल सहाय्यकाचे नाव आहे. अटक आरोपीने ही रक्कम स्वतःसह वरिष्ठांसाठी मागितल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या कार्यालयात चालणाऱ्या गैरव्यवहारांत वरिष्ठ अधिकारी देखिल सामील असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक गजानन राठोड, संजय गोवीलकर, पोलिस निरीक्षक रूपाली पोळ यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली.
या संदर्भात पोनि रूपाली पोळ यांनी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यातील तक्रारदार हा मूळचा उत्तरप्रदेशातील असून त्याने कल्याण तालुक्यातील रायते गावी दहा गुंठे जमीन खरेदी केली आहे. या जमिनीचा सात/बारा उतारा आणि फेरफाराची नोंद स्वत:च्या नावे होण्यासाठी तक्रारदार शेतकरी महसूल कार्यालयात प्रयत्नशील करत होता महसूल दप्तरी नोंद होण्याची प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता खरेदीदाराकडे शेतकरी असल्याचा दाखला आवश्यक होता. त्याशिवाय नोंद होणार नसल्याचे खरेदीदाराला महसूल विभागाने कळविले होते. खरेदीदाराने शेतकरी दाखल्यासाठी आपल्या मूळ गावी असलेल्या उत्तरप्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातील केराकत तहसीलदारांचा दाखला मिळण्याची मागणी त्या कार्यालयाकडे केली होती. त्याप्रमाणे तो दाखल कल्याण तहसीलदार कार्यालयाकडे प्राप्त झाला होता. जमीन खरेदीदाराची शेतकरी दाखल्यासह सात/बारा सदरी नोंद होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, असा प्रस्ताव रायते तलाठी यांना पाठविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक संतोष पाटील याने तक्रारदाराकडे 40 हजार रूपयांची मागणी केली. सर्व प्रक्रिया पूर्ण करूनही आपल्याकडे पैसे मागितले जात असल्याने जमीन खरेदीदाराने गेल्या शनिवारी ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेऊन तक्रार दाखल केली. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने पंचांसमक्ष पडताळणी केली. या पडताळणीत महसूल सहाय्यक संतोष पाटील हा स्वत:साठी 20 हजार आणि वरिष्ठांसाठी 20 हजार रूपये मागत असल्याचे निष्पन्न झाले. बुधवारी संध्याकाळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार जमीन खरेदीदाराने महसूल सहाय्यक संतोष पाटील याला लाचेची रक्कम देण्याचे कबुल केले.
तहसीलदार कार्यालयातील महसूल सहाय्यक कक्षाच्या मागील बाजूस तक्रारदार शेतकऱ्याकडून 40 हजार रूपयांची लाच घेताना पथकाने संतोष पाटील यांना रंगेहाथ पकडले. या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल सहाय्यक संतोष पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. महसूल सहाय्यक संतोष पाटील याने त्याच्या कोणत्या वरिष्ठाला अर्धी रक्कम देण्याचे तक्रारदाराला सांगितले होते, याचीही लाच विरोधी पोलिस सखोल चौकशी करत आहेत.