डोंबिवली : सहामही परीक्षेत कमी गुण मिळाल्याने तणावग्रस्त झालेल्या १४ वर्षाच्या मुलीने आपल्या राहत्या घराच्या १९ व्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपविले. कल्याण पश्चिमेतील मध्यमवर्गिय उच्चभ्रूंच्या रौनक सिटीमध्ये ही घटना गुरूवारी दुपारी घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. खडकपाडा पोलिस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिमेतील रौनक सिटीमध्ये काही महिन्यांपूर्वी दुर्दैवी मुलीचे कुटुंबिय राहण्यास आले होते. आई, आजी आणि बहिण असे चौकोनी कुटुंब होते. ही मुलगी उल्हासनगर येथील एका खासगी शाळेत आठव्या इयत्तेत शिक्षण घेत होती. स्वत:च्या अभ्यासात प्रगती होत नसल्याने ती तणावात होती. दिवाळीपूर्वी झालेल्या सहामही परीक्षेचा निकाल लागला लागला होता. त्यातही तिला कमी गुण मिळाले होते. शिक्षकांनी तिला नेहमीच अभ्यासात सुधारणा करण्याची सामंजस्याने सूचना केली होती.
नियमित अभ्यास करूनही आपली शैक्षणिक प्रगती होत नाही परिणामी परीक्षेत कमी गुण मिळत असल्याने या मुलीची चिंता वाढली होती. नुकत्याच झालेल्या परीक्षेतही कमी गुण मिळाल्याने मुलगी अस्वस्थ झाली होती. मोठी बहिण आपल्या बहिणीचा सहामही निकाल पाहण्यासाठी शाळेत गेली होती. तर मुलीची आई नोकरीसाठी गेली होती. अभ्यासात होत नसलेली प्रगती, परीक्षेत मिळणारे कमी गुण या सततच्या विचाराने नैराश्य आलेल्या मुलीने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. घरात आजी व्यतिरिक्त कुणीही नसल्याचे पाहून ही मुलगी घराच्या खिडकीत लोखंडी जाळीवर चढली.
मागचा पुढचा कसलाही विचार न करता १९ व्या माळ्यावरून तिने स्वतःला झोकून दिले. मुलगी जमिनीवर आदळताच मोठा आवाज झाल्याने परिसरातील सुरक्षा रक्षकांसह रहिवासी तिच्या मदतीसाठी धावले. ही मुलगी १९ व्या माळ्यावरून तळमजल्यावर असलेल्या एका दुचाकीवर आदळली. गंभीर दुखापत झालेल्या मुलीला तातडीने उपस्थितांनी जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. डाॅक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. खडकपाडा पोलिस या घटनेची चौकशी करत आहेत. रौनक सिटी भागातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या मुलीच्या आत्महत्येचा थरार कैद झाला आहे.