Women Robbers Kalyan
डोंबिवली : कल्याण रेल्वे स्थानक परिसरासह नवीन एसटी बस आगारात भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेषतः महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून आलेल्या प्रवाशांना लक्ष्य केले जात असल्याचे महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीतून स्पष्ट झाले आहे. सोमवारी दुपारच्या सुमारास दोन महिलांनी पुण्याहून आलेल्या एका महिलेला बोलण्यात गुंतवून तिच्या पर्समधील रोकडसह सोन्याचा ऐवज काढून घेऊन पोबारा केला.
पुण्यातील मोशी जवळील नकातेनगर-थेरगावात राहणाऱ्या मंदा साबळे या कल्याणमध्ये आपल्या नातेवाईकाकडे आल्या होत्या. त्या सोमवारी पुन्हा पुण्याकडे निघाल्या होत्या. त्यांनी स्वतः जवळील पर्समध्ये पैसे व सोन्याचे दागिने असा एकूण ४६ हजार ५०० रूपये किंमतीचा ऐवज ठेवला होता. इतक्यात वाटेत अडवून दोन महिलांनी बोलण्यात गुंतवून नजर चुकवून त्यांच्या पर्समधील छोटी पर्स काढून पलायन केले.
तक्रारदार महिला मंदा साबळे या कल्याण रेल्वे स्थानक परिसरात आल्या. त्यांना पर्सची चेन उघडी असल्याचे दिसले. पर्स उघडून पाहिली असता रोख रक्कम, सोन्याचा ऐवज असलेली छोटी पर्स गायब असल्याचे लक्षात आले. मंदा साबळे यांनी तात्काळ रेल्वे स्थानक परिसरात भेटलेल्या दोन्ही महिलांचा शोध घेतला. मात्र त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. रोकडसह ऐवज असलेली पर्स अचानक गायब झाल्याने मंदा साबळे अस्वस्थ झाल्या. त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे.
दोन/तीन महिन्यांच्या कालावधीत रेल्वे स्थानक परिसरासह नवीन एसटी बस आगारातून प्रवाशांना लुटून चोरांनी लाखो रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. रेल्वे स्थानक भागात गर्दुल्ले, अंमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे अड्डे असायचे. पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी कल्याणात पाय ठेवल्यापासून चोर, नशेखोरांची पळता भुई थोडी झाली आहे. त्यांचे अड्डे उङ्खस्त करण्यात आले आहेत. रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांच्या गस्ती असूनही चोऱ्यामाऱ्या थांबत नसल्याने पादचाऱ्यांसह प्रवाशांत नाराजीचा सूर उमटत आहे.