Two Wheeler Accident (Representative Image) PUDHARI
ठाणे

Kalyan Road Accident: दुचाकीची गॅस सिलिंडर टेम्पोला धडक, विचित्र अपघातात कल्याणच्या 23 वर्षांच्या तरुणाचा अंत

याठिकाणी असलेला उतारासह चढण रस्ता ठरतोय जीवघेणा

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण पूर्वेतील पूना लिंक रोडवर अपघाताचे सत्र सुरूच असून शनिवारी एका विचित्र अपघातात 23 वर्षीय तरुणाला जीव गमवावा लागला आहे. कल्याण पूर्वेत राहणाऱ्या रवी विनोद चव्हाण (वय 23, रा. कर्पेवाडी) या तरुणाचा अपघातात मृत्यू झाला असून या रस्त्यावर तिसऱ्या महिन्यात हा चौथा अपघात झाला आहे.

केडीएमसीच्या ड प्रभाग कार्यालय ते विजयनगर नाक्यादरम्यानच्या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. याच रस्त्याच्या दरम्यान शुक्रवारी दुपारच्या सुमारास  विचित्र अपघात झाला. निखिल सचिन कर्पे (१८, रा. म्हसोबा चौक कल्याण-पूर्व) आणि रवी चव्हाण हे दोघे दुचाकीवरून तिसगाव नाक्यावरून काटेमानिवलीच्या दिशेने जात होते.

सेंट्रल बँकेसमोरील चढ रस्त्यावर आले असता दुचाकीने गॅस सिलिंडर नेणाऱ्या मिनी टेम्पोला धडक दिली. यात दुचाकी चालवणारा निखिल खाली पडला. तर रवी हा रस्त्याच्या दिशेने फेकला गेला. याच दरम्यान मागून आलेले वाहन त्याच्या अंगावरून गेले आणि रवीचा घटनास्थळीच मृत्यू झाला.  

या अपघाताची स्थानिक कोळसेवाडी पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरिक्षक गणेश न्यायदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक पडवळ अधिक तपास करत आहेत.

तीन महिन्यांत चार अपघात

काटेमानिवलीचा भाग हा उंच टेकडी सदृश्य आहे. टेकडीचा काही भाग समतोल करून या भागात रस्ता तयार करण्यात आला आहे. काटेमानिवली विजयनगर भागात रस्त्याला उभा चढाव आणि खोल उतार आहेत. या रस्त्यावरून अवजड वाहन उतरताना चालकाला अतिशय काटेकोरपणे वाहन चालवावे लागते. वाहन उतरत असताना ब्रेक निकामी झाल्यास तेच वाहन उतारावरून घरंगळत समोरील दुकाने, दुभाजकला धडकते. गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत असे प्रकार सलग चारदा घडले आहेत.

अपघातग्रस्त रस्त्याबद्दल उपाययोजना व्हावी

सर्व अपघात गे प्रभाग ड कार्यालय ते विजयनगर नाका या उताराच्या रस्त्यावर झाले आहेत. परंतु हा विचित्र अपघात उलट दिशेने म्हणजेच विजय नगर ते ड प्रभाग कार्यालया दरम्यानच्या चढण असलेल्या रस्त्यावर तेही उभ्या असलेल्या थ्री व्हिलर पिकपला मागून दुचाकीने ठोकर दिल्यामुळे घडला आहे. या अपघातात एकाचा बळी गेल्याने हा अपघातग्रस्त रस्ता पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे धोकादायक ठरलेल्या या रस्त्याबद्दल प्रशासनाने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी वाहनचालकांसह या भागातील रहिवाशांची मागणी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT