ठाणे

Kalyan News : कल्याणमध्ये ‘मराठी ग्राहक’ विरुद्ध ‘परप्रांतीय दुकानदार’ वाद; भांडी खरेदीवरून कोळसेवाडीत दीड तास राडा

स्थानिकांच्या मध्यस्थीने तणाव निवळला; घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात असलेल्या 'अजय स्टील' या दुकानात भांडी खरेदीवरून मराठी ग्राहक आणि परप्रांतीय दुकानदार यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याची घटना घडली आहे. शाब्दिक वादाचे रूपांतर थेट मारहाणीच्या प्रयत्नात झाल्याचा आरोप ग्राहक महिलेने केला असून, या प्रकारामुळे परिसरात सुमारे दीड तास तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

नेमका वाद काय?

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ग्राहक 'लकी ड्रॉ'मधील भांडी घेण्यासाठी दुकानात गेल्या होत्या. तेथील भांड्यांचे दर जास्त वाटल्याने त्यांनी खरेदी न करता बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. ‘भांडी महाग आहेत,’ असे म्हटल्याचा राग मनात धरून दुकानदाराने, ‘परवडत नसेल तर कशाला येता?’ असे म्हणत अरेरावी केल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

दुकानदाराच्या पत्नीकडून शिवीगाळ?

महिला ग्राहकाने दिलेल्या माहितीनुसार, दुकानदार आणि त्याच्या कुटुंबीयांनी उद्धटपणाची सीमा ओलांडली. ‘आम्ही दुकानातून बाहेर पडत असताना दुकानदाराच्या पत्नीने आणि मुलीने आम्हाला शिवीगाळ केली आणि अंगावर मारून नेण्याचा प्रयत्न केला. मराठी माणूस दिसला की परप्रांतीय लोक अशीच अरेरावी करतात, जे आम्ही सहन करणार नाही,’ असा इशारा संतप्त ग्राहकांनी दिला.

व्हिडिओ व्हायरल, स्थानिकांची मध्यस्थी

दुसरीकडे, दुकानदाराने ग्राहकांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ‘आम्ही कोणताही वाद घातला नाही, उलट ग्राहकच आमच्याशी हुज्जत घालत होते,’ असे दुकानदाराचे म्हणणे आहे. या संपूर्ण वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यात दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत.

हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता होती, मात्र परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक नागरिकांनी मध्यस्थी केली. स्थानिकांच्या समजुतीनंतर दोन्ही बाजूंनी नमती भूमिका घेतल्याने हा वाद मिटला आणि पुढील अनर्थ टळला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT