डोंबिवली : कल्याण पूर्वेकडील गवळीनगर/विजयनगर परिसरातील श्री संचार सोसायटीच्या तिसऱ्या मजल्यावरील रूम क्रमांक १३ मध्ये राहणाऱ्या सागर वारुळे यांच्या कुटुंबावर अचानक मोठे संकट ओढवले. एकीकडे मुलाची प्रकृती बिघडल्याने कुटुंबीय त्याला उपचारासाठी रुग्णालयात घेऊन गेले असताना, दुसरीकडे बंद घरातील फ्रिजचा अचानक स्फोट होऊन शॉर्ट सर्किट झाले. या दुर्घटनेत घरातील संपूर्ण गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. दरम्यान, पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला आहे.
वारुळे कुटुंबीयांच्या घरातील फ्रिजमध्ये स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीमुळे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि इतर गृहोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे वारुळे कुटुंबासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यावेळी त्यांनी वारुळे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना धीर दिला, तसेच या कुटुंबाचे घर पुन्हा उभे करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले.
सुरक्षेबाबत जनजागृती हवी - महेश गायकवाड
"संकटाच्या काळात गरजू कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे हीच खरी माणुसकी आणि समाजसेवेची भावना आहे. सागर वारुळे यांच्या कुटुंबाला या कठीण प्रसंगी सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यांच्या घरात पुन्हा आनंद आणि सुरक्षितता निर्माण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत," असे महेश गायकवाड यांनी यावेळी सांगितले.
अचानक उद्भवलेल्या या दुर्घटनेनंतर मदतीचा हात मिळाल्याने वारुळे कुटुंबीयांनी महेश गायकवाड यांचे आभार मानले. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर बंद घरात विद्युत उपकरणे सुरू ठेवताना रहिवाशांनी अधिक काळजी घेण्याची आणि सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत जागरूक राहण्याची गरज असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.