डोंबिवली : बुधवारी सकाळी शाळेच्या गणवेशात घराबाहेर पडलेल्या दहाव्या इयत्तेतील चार मैत्रिणी अचानक बेपत्ता झाल्याने पालकांसह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली होती. बाजारपेठ पोलिसांनी अवघ्या काही तासांत तांत्रिक तपासाच्या आधारे या मुलींचा माग काढला. या चारही जणी अरावली एक्सप्रेसने राजस्थानच्या दिशेने निघाल्याचे उघड झाले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे मारवाड जंक्शन येथे रेल्वेतून या मुलींना सुखरूप ताब्यात घेण्यात आले.
घरातून निघाल्या...पण शाळेत पोहोचल्याच नाहीत
कल्याणमधील एका प्रसिद्ध शाळेतील चार अल्पवयीन विद्यार्थीनी अचानक बेपत्ता झाल्या. शाळेत जाण्यासाठी घरातून निघालेल्या या मुली दुपारपर्यंत घरी न परतल्याने पालकांमध्ये प्रचंड भितीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली आणि अवघ्या ४ तासांत या चौघींचा शोध लावला.
घरच्यांना कोणतीही कल्पना न देता या चारही मुली देवदर्शनासाठी थेट राजस्थानमधील अजमेरला निघाल्याचे तपासात समोर आले आहे. यातील दोन मुली आठवीच्या वर्गात तर दोन मुली नववीच्या वर्गात शिकत आहेत. बुधवारी सकाळी त्या नेहमीप्रमाणे शाळेसाठी निघाल्या. मात्र दुपारपर्यंत घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शाळेत संपर्क केला. तेव्हा त्या चारही जणी शाळेत आल्या नसल्याचे समजले. घाबरलेल्या पालकांनी तातडीने बाजारपेठ पोलिस ठाणे गाठून मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दिली.
सीसीटीव्हीसह मोबाईल लोकेशनमुळे उलगडा
चार अल्पवयीन मुली एकाच वेळी अचानक बेपत्ता झाल्याने त्यांचा शोध घेणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. डीसीपी अतुल झेंडे आणि एसीपी अशोक होनमाने यांनी तातडीने पावले उचलली. मुलींसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तपासासाठी विशेष ६ पथके तैनात केली.
गुन्हा दाखल होताच खडकपाडा पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल लोकेशन तपासताच पोलिसांना माहिती मिळाली की, या चारही मुली कल्याण रेल्वे स्थानकातून मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथे गेल्या आणि तेथून त्यांनी अजमेरला जाण्यासाठी अरावली एक्स्प्रेस पकडली. मुली अरावली एक्स्प्रेसने प्रवास करत असून त्या राजस्थानमधील मारवाड रेल्वे स्थानकावर पोहोचणार असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. वेळ न घालवता तात्काळ लोहमार्ग पोलिस आणि राजस्थान पोलिसांना अलर्ट केले. त्यामुळे मारवाड जंक्शन येथे एक्स्प्रेस पोहोचताच चारही मुलींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना
कोणत्यातरी अमिषाला बळी पडून किंवा कुणाच्या सांगण्यावरून या मुली घर सोडून गेल्या होत्या का ? स्वतःच्या मर्जीने त्या राजस्थानला फिरायला निघाल्या होत्या का ? या प्रश्नाचा उलगडा त्या मुली कल्याणात आल्यावर होणार आहे. या मुलींना आणण्यासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना करण्यात आले आहे. दरम्यान तेथील पोलिसांनी जोधपूरच्या सरकारमान्य बालिकागृहात यावरही मुलींना समुपदेशनासाठी दाखल केले आहे.
मुलांशी बोला...त्यांचा ताण समजून घ्या - पोलिसांचे आवाहन
अशा घटनेमुळे पालक, शाळा आणि समाज म्हणून आपण मुलांच्या मानसिक आरोग्याकडे किती गंभीरपणे पाहतो, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आवाहन केले आहे.अल्पवयीन मुले-मुली रागाच्या भरात किंवा ताण-तणावामुळे घर सोडण्याच्या घटना वाढल्या आहेत. पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा. त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात. मुलांच्या वर्तनात बदल दिसल्यास दुर्लक्ष करू नये. वेळीच पोलिसांची मदत घ्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.