ठाणे

Kalyan News : ठोस पुराव्यांअभावी हत्येच्या खटल्यातून चौघांची निर्दोष मुक्तता

मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : एका बहुचर्चित हत्येच्या खटल्यात सरकारी पक्षाकडून ठोस आणि थेट पुरावे सादर न होऊ शकल्याने कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाने चारही संशयितांची निर्दोष मुक्तता केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणाची सुनावणी अत्यंत गतिमान पद्धतीने आणि निर्धारित मुदतीआधीच पूर्ण झाली.

ऑगस्ट २०२४ मध्ये विक्रोळी (मुंबई) येथील देवेंद्र उर्फ देवा प्रधान (वय ३०) या तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्याचा मृतदेह शहापूर तालुक्यातील विहीगाव परिसरात मिळून आला होता. या प्रकरणी पुरावा नष्ट केल्याचा आणि हत्येचा संशय व्यक्त करत कसारा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले होते.

खटल्यादरम्यान सरकारी पक्षातर्फे एकूण नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र, त्यातील काही साक्षीदारांनी सुरुवातीच्या जबाबांना न्यायालयात दुजोरा दिला नाही. तसेच घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा थेट तांत्रिक पुरावा समोर आला नव्हता. संपूर्ण खटला हा केवळ संशयास्पद घटनाक्रम आणि परिस्थितीजन्य अनुमानांवर आधारित राहिला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद आणि कागदपत्रे तपासल्यानंतर, संशयितांचा या गुन्ह्याशी थेट संबंध सिद्ध करण्यात सरकारी पक्ष अपयशी ठरल्याचे न्यायालयाने नमूद केले. संशयाचा फायदा देत न्यायालयाने शैलेश हरिभाऊ गायकवाड, अनिकेत पप्पू कांबळे, अजय अरुण बायेत आणि मयूर दयानंद शिर्के या चौघांची भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ मधील संबंधित कलमांखालील आरोपांतून सन्मानपूर्वक निर्दोष मुक्तता केली, तसेच त्यांचे जामीन बंधपत्रही रद्द केले.

या खटल्यात संशयितांतर्फे ॲड. टी. ए. देवरे आणि ॲड. आर. भांडारकर यांनी बाजू मांडली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT