डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एकेरी उल्लेखाचे पडसाद उमटू लागले आहेत. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त करत भाजपाच्या कल्याण ग्रामीण मंडळाचे शिक्षण आघाडी सचिव दुर्गेश बागुल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेली टीका चुकीची असल्याचे सांगत दुर्गेश बागुल यांनी नुकताच एक व्हिडिओ प्रसारित केला होता. या व्हिडिओमध्ये त्यांनी मराठी अस्मितेचा मुद्दा उपस्थित करत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
दुर्गेश बागुल यांच्या या विधानानंतर भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्यांना तातडीने बोलावून घेतले आणि केलेल्या वक्तव्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. "पक्षशिस्तीच्या विरोधात जाऊन सार्वजनिकरीत्या असे विधान करणे योग्य नाही," असे त्यांना सांगण्यात आले. पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेनंतर दुर्गेश बागुल यांनी भाजपा पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. राजीनामा देताना, "मराठी अस्मितेसाठी मी हा निर्णय घेत असून, मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही," अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
विशेष म्हणजे, राजीनाम्यानंतरही कोणत्याही दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार नसल्याचे बागुल यांनी जाहीर केले आहे. "आपण मराठी अस्मितेसाठी हा निर्णय घेतला आहे; त्यामुळे सध्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून मराठी माणसांसाठी काम करत राहीन," असे ते म्हणाले. या घटनेमुळे भाजपामध्ये एकच खळबळ उडाली असून मराठी मुद्द्यावरून पक्षांतर्गत नाराजी उघड झाल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.