डोंबिवली : जिद्द, चिकाटी आणि अफाट साहसाच्या जोरावर कल्याणच्या एका ७ वर्षीय चिमुरड्याने अरबी समुद्राच्या लाटांवर स्वार होत नवा इतिहास रचला आहे. कल्याणमधील रिजेन्सी पार्क येथे राहणाऱ्या पार्थ कुणाल सोरते याने अटल सेतू ते गेटवे ऑफ इंडिया हे सुमारे १७ किलोमीटरचे अंतर अवघ्या २ तास १८ मिनिटांत पोहून पार करत सर्वांनाच थक्क केले आहे.
आर्या गुरुकुल हायस्कूलमध्ये इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या पार्थला समुद्रात पोहण्याची विशेष ओढ आहे. मंगळवारी पहाटे २ वाजून १८ मिनिटांनी समुद्रदेवतेचे पूजन करून आणि अंगाला ग्रीस लावून पार्थने समुद्रात झेप घेतली. पौर्णिमेच्या चांदण्याने आसमंत उजळला असला, तरी दाट धुके आणि लहान-मोठ्या बोटींमुळे निर्माण होणाऱ्या लाटांचे मोठे आव्हान त्याच्यासमोर होते. खाऱ्या पाण्याचे फवारे डोळ्यांत जात असताना आणि समुद्रातील लहान मासे अंगाला टोचत असतानाही, पार्थने डगमगून न जाता आपला प्रवास सुरू ठेवला. महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटनेचे निरीक्षक सुनील मयेकर यांच्या देखरेखीखाली हा उपक्रम पार पडला.
विशेष म्हणजे, पार्थने यापूर्वी कधीही प्रत्यक्ष 'गेटवे ऑफ इंडिया' पाहिले नव्हते. समुद्रातून पोहत जात असतानाच पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांनी त्याने पहिल्यांदा हे ऐतिहासिक प्रवेशद्वार पाहिले आणि आपले लक्ष्य पूर्ण केले. त्याच्या या यशाबद्दल प्रशिक्षक विलास माने, रवी नवले, संतोष सर आणि यश जिमखान्याचे मालक राजू वडनेरकर यांनी त्याचे तोंडभरून कौतुक केले.
"धरमतर ते गेटवे हे ३६ किमीचे अंतर पोहून पार करणे हे माझे पुढील स्वप्न आहे."— पार्थ सोरते (बाल जलतरणपटू)