डोंबिवली: कल्याण-मलंगगड रोडला असलेल्या आडीवलीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. एका १९ वर्षीय नराधम सैतानाने ८ वर्षांच्या चिमुकलीशी गैरवर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आणि संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संबधीत आरोपी मोल-मजुरीचे काम करतो. पण कृत्य मात्र त्याने हैवानाला लाजवेल असे केले आहे. पसार झालेल्या या सैतानाला पकडण्यासाठी मानपाडा पोलिसांनी तपास चक्रांना वेग दिला आहे.
मध्यमवर्गीय कुटुंबातील या चिमुरडीवर भयंकर प्रसंग गुदरला आहे. या भागाचे विद्यमान नगरसेवक कुणाल पाटील यांनी पिडीत चिमुरडीसह तिच्या पालकांना धीर दिला. या प्रकरणी पिडीत मुलीच्या संतप्त कुटुंबीयांनी थेट मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनीही क्षणाचाही विलंब न करता आरोपीविरोधात विनयभंगासह गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.
मात्र आपल्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची खबर मिळताच वासनांध आरोपी याने पोबारा केला. चिमुरडीच्या न्यायासाठी मानपाडा पोलिसांनी कंबर कसली आहे. आरोपीला जेरबंद करण्यासाठी विशेष पथके तयार करून वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली आहेत. तांत्रिक तपास आणि खबऱ्यांच्या जाळ्यातून आरोपीचा माग काढला जात आहे.
त्याला लवकरच बेड्या ठोकू, असा ठाम विश्वास मानपाडा पोलिसांनी व्यक्त केला आहे. एका ८ वर्षांच्या निष्पाप जीवावर झालेल्या या अत्याचाराने कल्याण-डोंबिवलीकर संतापले आहेत. सगळ्यांच्या नजरा पोलिसांच्या कारवाईकडे लागल्या आहेत. हा नराधम कधी गजाआड जाणार, याचीच सगळे वाट पाहत आहेत.
आरोपीला कठोर शिक्षा...परिसरात पोलीस चौकी द्या नागरिकांची मागणी
आडीवलीत ८ वर्षांच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शिवसेना नगरसेवक कुणाल पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्या केल्या आहेत. आरोपीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच आडीवली, ढोकळी व आसपासच्या परिसरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी या परिसरात पोलिस चौकी देण्यात यावी, अशी मागणीही कुणाल पाटील यांनी केली.