गवळी बंधूंना दोन वर्षांकरिता सातारा जिल्ह्यात हद्दपार केले असून त्यांना पाटण पोलिसांच्या स्वाधीन केले. Pudhari Photo
ठाणे

कल्याण बालिका अत्याचार प्रकरण: विशाल गवळीच्या तिघा भावांनाही दणका

Kalyan Girl Rape-Murder Case | दोन वर्षांकरिता तीन जिल्ह्यांतून तडीपार

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली: पुढारी वृत्तसेवा: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात राहणाऱ्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणारा नराधम विशाल गवळी याचे तिन्ही भाऊ पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती हाती येताच पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी या तिन्ही गुंडांच्या नांग्या ठेचून काढल्या आहेत. या तिन्ही भावांकडून देखिल समाजाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने डीसीपी अतुल झेंडे यांनी त्यांना दोन वर्षांसाठी ठाणे, मुंबई आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांतून तडीपार केले आहे. (Kalyan Girl Rape-Murder Case)

आकाश अभिमान गवळी (वय 33), शाम अभिमान गवळी (वय 34) आणि नवनाथ अभिमान गवळी (वय 28) अशी हद्दपार केलेल्या बदमाशांची नावे असून चक्कीनाका भागातील रहिवाशांसह व्यापारी आणि दुकानदारांमध्येही या तिघांची प्रचंड दहशत आहे. (Kalyan Girl Rape-Murder Case)

अनेक गुंडांनी घाबरून शहराबाहेर पळ काढला

या कारवाईमुळे कल्याण-डोंबिवलीत गेल्या अनेक वर्षांपासून दहशत माजवणाऱ्या गुंडांच्या उरात धडकी भरली आहे. अनेक गुंडांनी घाबरून शहराबाहेर पळ काढला आहे. समाजाला धोका निर्माण करणाऱ्या, कायदा शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या कोळसेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील छोट्या-मोठ्या गुंड आणि गुन्हेगारांची पोलिसांनी यादी तयार केली आहे. अशा गुंडावर संघटित गुन्हेगारी कायद्यासह हद्दपारीच्या कारवाया करण्यात येणार असल्याचे उपायुक्त झेंडे यांनी सांगितले. (Kalyan Girl Rape-Murder Case)

तिन्ही गुंडांच्या दहशतीमुळे रहिवाशांसह व्यापारी,  दुकानदार भीतीच्या छायेखाली

बालिका अत्याचार-हत्याकांड प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याचे कल्याण पूर्वेतील नंदादीप सोसायटी, नंदादीप नगर, चक्कीनाका भागात राहणारे आकाश, शाम आणि नवनाथ या तिन्ही भावांच्या नावावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, मालमत्तेचे नुकसान करणे, गंभीर दुखापती करणे, आदी गुन्ह्यांच्या नोंदी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात असून तसे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही गुंडांच्या उपद्व्यापांमुळे परिसरातील रहिवाशांसह व्यापारी आणि दुकानदार भीतीच्या छायेखाली राहत होते. या गुंडांबद्दल स्थानिक कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रारी वाढत चालल्या होत्या. पोलिस उपायुक्त झेंडे यांनी या तिन्ही गुंडांची माहिती संकलित करण्याचे आदेश कोळसेवाडी पोलिसांना दिले. (Kalyan Girl Rape-Murder Case)

वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी या तिन्ही भावांना महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 चे कलम 55 अन्वये हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपायुक्त अतुल झेंडे यांच्यासमोर ठेवला होता. उपायुक्त झेंडे यांनी तातडीने हा प्रस्ताव मंजूर केला. या तिन्ही भावांना पोलिसांनी तडीपाराच्या नोटिसा बजावल्या. त्यानंतर ताब्यात घेऊन त्यांना सातारा जिल्ह्याच्या हद्दीत नेऊन सोडण्यात आले.

विशाल गवळी सध्या पत्नीसह तुरुंगात

चक्कीनाका परिसरात अत्याचार करून बालिकेची हत्या करणारा विशाल गवळी सध्या पत्नीसह तुरुंगात आहे. त्याच्या तिन्ही गुंड भावांवर केलेल्या कारवाईने कल्याण पूर्वेतील चक्कीनाक्यासह तिसगाव परिसरातील रहिवासी, व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक आणि दुकानदारांनी समाधान व्यक्त केले आहे. (Kalyan Girl Rape-Murder Case)

रेकॉर्डवरील गुन्हेगारांची गय नाही

कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यातील अर्थात आठही पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती काढण्याचे काम सुरू आहे. कल्याण पूर्वेत गुंडगिरी करणाऱ्या सक्रिय गुन्हेगारांची यादी कोळसेवाडी पोलिसांनी तयार केली आहे. लवकरच पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांवर संघटित गुन्हेगारी अर्थात मोक्का तसेच हद्दपारीच्या कारवाया केल्या जाणार असल्याचे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. (Kalyan Girl Rape-Murder Case)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT