Fire Near Mayor Residence Kalyan Pudhari
ठाणे

Kalyan Fire | कल्याणात महापौर निवासासमोर भीषण आग; गॅरेजसह ४ वाहने जळून खाक

आगीत गॅरेजसह बाहेर उभ्या असलेल्या २ कार आणि २ दुचाक्या जळून खाक

पुढारी वृत्तसेवा

Fire Near Mayor Residence Kalyan

डोंबिवली : कल्याण पश्चिमेकडे असलेल्या निक्कीनगर परिसरात शुक्रवारी (दि.२०) सकाळी साडेनऊच्या सुमारास तेथील गॅरेजसह शेजारील दुकानात भीषण आग लागली. भडकलेल्या आगीत गॅरेजसह बाहेर उभ्या असलेल्या २ कार आणि २ दुचाक्या जळून खाक झाल्या. तसेच दुकान मालक गणेश जादवलकर यांच्या गॅरेजमध्ये ठेवलेले सर्व साहित्यही जळून गेले. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता.

आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची टीम घटनास्थळी पोहोचली आणि कठोर परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. अग्निशमन विभागाचे मुख्य अधिकारी नामदेव चौधरी यांनी सांगितले की, घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु ४ वाहने आणि दुकानातील साहित्य पूर्णपणे जळून गेले आहे. आग लागण्याच्या कारणांचा तपास केला जात आहे. आग महापौर बंगल्याच्या अगदी समोर लागली होती. त्यामुळे माहिती मिळताच महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी अग्निशमन दलाला सूचना दिली आणि घटनास्थळी जाऊन पाहणी केली. 

सरकारी जमिन काही महिन्यांपूर्वीच बुलडोझरने भुईसपाट 

ज्या गॅरेजला आग लागली, तेथील सर्व दुकाने सरकारी जमिनीवर अवैधरित्या बांधण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. काही महिन्यांपूर्वीच कल्याणचे तहसीलदार सचिन शेजाळ यांनी येथे अतिक्रमण करून बांधण्यात आलेली दुकाने बुलडोझरने पाडली होती. परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा येथे दुकाने उभी राहिली आहेत. स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे अवैध दुकानांवर कायमस्वरूपी कारवाई करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून निवासी भागात कुणीही अतिक्रमण करू शकणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT