कल्याणमध्ये मराठी-अमराठी वरून वाद पेटला Pudhari File Photo
ठाणे

Marathi vs non-Marathi news | कल्याणमध्ये मराठी-अमराठी वरून वाद पेटला

मराठी माणसांबद्दल अपशब्द वापरणार्‍या हॉटेलचालकाला मनसैनिकांचा चोप

पुढारी वृत्तसेवा

कल्याण : कल्याण पूर्वेतील दुर्गामाता मंदिर चौक परिसरात एका हॉटेल चालकाने मराठी माणसांबद्दल बोलताना त्यांना बेदम मारहाण करू, त्याच बरोबर काही अपशब्द वापरले होते. ही दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांमध्ये प्रसारित होताच, मनसैनिकांनी संघटितपणे जाऊन त्या हॉटेल चालकाला जाब विचारून त्याला चोप दिला. पुन्हा असा काही प्रकार केला तर मनसे पध्दतीने धडा शिकवण्याचा इशाराही यावेळी मनसैनिकांनी दिला.

मनसे कार्यकर्त्यांचा आक्रमकपणा पाहून हॉटेल चालकाने मराठी माणसाबद्दल पुन्हा असे काही वक्तव्य करणार नाही असे जाहीरपणे सांगून घडल्या प्रकाराबद्दल पक्षप्रमुख राज ठाकरे आणि मराठी माणसाविषयी केलेल्या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.

महाराष्ट्रात राहता तर मग मराठी आलीच पाहिजे, असे मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या वक्तव्यापासून मनसैनिक मराठीच्या विषयावर अधिक आक्रमक झाले आहेत. कल्याण पूर्व भागात दुर्गामाता मंदिर भागात एक इडली डोसा विक्रीचे हॉटेल आहे. या हॉटेलच्या चालकाची मराठी माणसाला बद्दल अपशब्द वापरणारी दृश्यध्वनी चित्रफित समाज माध्यमांत प्रसारित झाली होती. या दृश्यध्वनी चित्रफितीमध्ये हॉटेल मालक मराठी माणसाला लाल होईपर्यंत मारू, अशी भाषा करत होता. ही दृश्यध्वनी चित्रफित मनसेचे कल्याण पूर्वेतील पदाधिकारी कुश राजपूत यांना पाहण्यास मिळाली. त्यांनी कल्याण पूर्वेतील संबंधित हॉटेलचे ठिकाण आणि त्याचा ठावठिकाणा शोधला.

राजपूत यांनी आपल्या मनसे सैनिकांनी त्या हॉटेलच्या ठिकाणी जाऊन त्या हॉटेल चालकाला ‘तु मराठी माणसा बद्दल असे अपशब्द का वापरले. महाराष्ट्रात राहतोस, येथे पैसे कमावतो. उपजीविका करतो आणि पुन्हा मराठी माणसाला बेदम मारण्याची भाषा तू कशासाठी करतोस. असे प्रश्न कुश राजपूत यांनी हॉटेल चालकाला करून त्यांनी हॉटेल चालकाला चोप दिला आणि पुन्हा असे काही वक्तव्य केले तर मनसे पध्दतीने दणका देण्याचा इशारा दिला.

या घटनेची माहिती मिळताच इतर मनसै सैनिक हॉटेल भागात जमा झाले. हे प्रकरण वाढत आहे हे दिसताच हॉटेल मालकाने घडल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली. पुन्हा असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही, असे आश्वासन आलेल्या मनसैनिकांना दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT