Kalyan Local  
ठाणे

Kalyan Local Breakdown | कल्याणमध्ये ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर गणेश भक्तांसह प्रवाशांचे हाल!

मध्य रेल्वेच्या नियोजनाचा बोजवारा, लोकल गाड्या तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ जागीच

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मध्य रेल्वेचा बेपर्वा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कल्याण रेल्वे स्थानकात दुपारी तीनच्या सुमारास प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील ओव्हरहेड वायरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे कसारा डाऊन मार्गावरील संपूर्ण वाहतूक कोलमडली. याचा सर्वात मोठा फटका गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या आणि बाप्पाच्या आगमनाची तयारी करणाऱ्या हजारो गणेश भक्तांना आणि नोकरदार प्रवाशांना बसला आहे.

     रविवार असल्याने अनेक मुंबईकर चाकरमानी बाप्पाला आणण्यासाठी आणि सणासाठी गावी जाण्याच्या तयारीत होते. दुपारच्या सुमारास लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांना गर्दी असतानाच कल्याण येथे ओव्हरहेड वायरचा बिघाड झाला. परिणामी कसारा डाऊन मार्गावरील लोकल गाड्या तब्बल ४५ मिनिटांहून अधिक काळ जागीच थांबून होत्या. काही एक्स्प्रेस गाड्या देखील कल्याणच्या अलीकडे थांबवण्यात आल्याने गाड्यांमध्ये बसलेल्या प्रवाशांचे अक्षरशः वांदे झाले.

     गणेशोत्सवाच्या काळात मध्य रेल्वे प्रशासनाकडून अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात, मात्र आहे त्या गाड्यांची देखभाल आणि ओव्हरहेड वायरची तपासणी वेळेत होत नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत, असा संताप प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. ऐन सणासुदीच्या काळात प्लॅटफॉर्म क्रमांक ३, ४ आणि ५ चा विद्युत पुरवठा देखील बंद करावा लागल्याने इतर मार्गावरील गाड्याही विस्कळीत झाल्या होत्या. परिणामी कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी साचली होती.

    बिघाडाची माहिती मिळताच तांत्रिक पथकाने धाव घेतली असली तरी तोपर्यंत प्रवाशांचे तासभर हाल झाले होते. पर्यायी व्यवस्था म्हणून काही गाड्या प्लॅटफॉर्म क्रमांक ६ आणि ७ वरून चालवण्यात आल्या, मात्र त्यामुळे गोंधळात आणखी भर पडली. फलाट बदलल्याने अनेक प्रवासी सैरावैरा धावताना दिसत होते. गणेशोत्सवासारख्या मोठ्या सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने आधीच सर्व यंत्रणा तपासून सज्ज ठेवणे अपेक्षित असताना अशा प्रकारे ऐनवेळी बिघाड होणे हे प्रशासनाच्या नियोजनशून्यतेचे द्योतक आहे. आता तरी रेल्वे प्रशासनाने गणेशोत्सव काळात अशी पुनरावृत्ती होऊ नये यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी मागणी प्रवासी आणि गणेश भक्तांमधून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT