मृत ज्योती दाहिजे व दिलीप दाहिजे Pudhari Photo
ठाणे

Kalyan Crime | ज्योती दाहिजे खून प्रकरणाला कलाटणी, पत्नीची हत्या करून खून करणाऱ्या पतीनेही जीवन संपविले

भांडूप स्थानकात लोकलखाली घेतली उडीः ज्योतीचा खून करून पसार होता पती

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-शिळ महामार्गावरील कोळेगाव परिसरात राहणाऱ्या ज्योती दाहिजे (२९) खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. ज्योतीचा खून करून पसार झालेल्या पोपट दिलीप दाहिजे (३६) याचा मृतदेह मध्य रेल्वे मार्गावरील भांडूप स्थानकात आढळून आला. पोपटने ज्योतीचा गळा घोटून खून केल्यानंतर पोपट घटनास्थळावरून पसार झाला होता. पत्नीची हत्या केल्यानंतर पाश्चाताप झाल्याने पोपटनेही स्वतःचे जीवन संपवून टाकल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात समोर आले आहे.

या संदर्भात कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी मानपाडा पोलिसांना तशी माहिती दिली आहे. सोमवारी सकाळी १०. ४३ च्या सुमारास भांडूप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ च्या फास्ट लाईनवर पोपटचा मृतदेह आढळून आला. मूळचा जालना जिल्ह्यातील दहिफळे खंदारे गावचा रहिवासी असलेल्या पोपटचा मृतदेह उत्तरीय तपासणी केल्यानंतर त्याचे वडील दिलीप अण्णाभाऊ दाहिजे (७९) यांच्या ताब्यात देण्यात आला.

  या संदर्भात लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट दाहिजे याने सोमवारी सकाळी १०.४३ च्या सुमारास भांडूप रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ समोरून धावणाऱ्या ३१ क्रमांकाच्या लोकलसमोर उडी मारून स्वतःहून आत्महत्या केली. त्याच्याजवळ एक तुटलेला मोबाईल आढळून आला. पोलिसांनी मोबाईल दुरूस्त करणाऱ्याच्या मदतीने पोपटच्या तुटलेल्या मोबाईलचा आयएमईआय नंबर शोधून त्याचे ट्रेसिंग कॉल डिटेल्स काढले. या कॉल डिटेल्समध्ये जास्त फोन केलेल्या नंबरवर संपर्क साधले असता सदर मोबाईलवरून डोंबिवलीच्या मानपाडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांना फोन केल्याचे समोर आले.

हा नंबर ज्योतीचा खून करणारा पती पोपटाचा असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाचा फोटो मोबाईलद्वारे मागून घेतल्यानंतर मृत पोपट ही मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असल्याची खात्री पटली. त्यानंतर मृत पोपटच्या वारसांना फोन करून कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्यात पाठवले. पोपटचा मृतदेह दाखवल्यानंतर वारसांनी खात्री केली. त्यानंतर पोपटाचा मृतदेह वारसांना ताब्यात देण्यात आल्याचे कुर्ला लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संभाजी यादव यांनी मानपाडा पोलिसांना पाठवलेल्या माहितीत नमूद केले आहे.

खुनाच्या आत्महत्येनंतर कारण गुलदस्त्यात


काटई नाक्यावरील कोळेगावात असलेल्या कृष्णाई नगरमध्ये असलेल्या सद्गुरू निवास चाळीतील रूम नं. ४ मध्ये ज्योती आणि पोपट दाहिजे हे दाम्पत्य राहते. पोपट हा यश डेव्हलपर्सकडे बिगारी म्हणून काम करतो. ज्योती आणि पोपट यांच्यामध्ये रात्री किरकोळ कारणावरून वाद झाला होता. हा वाद विकोपाला गेल्यानंतर पोपट धाहीजे याने संतापाच्या भरात पत्नी ज्योतीचा ओढणीच्या साह्याने गळा आवळून तिची हत्या केली.

ज्योती निपचित पडल्याची खात्री पटल्यानंतर पोपटने दाराला बाहेरून कुलूप लावून पळ काढला. ही घटना दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली मानपाडा पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास चक्रांना वेग दिला होता. दुसऱ्या दिवशी पोपटचा मृतदेह भांडूप स्थानकासमोरील रूळावर आढळून आला. पोपटने ज्योतीचा खून केल्यानंतर स्वतःलाही संपवून टाकले आहे. तथापी पोपट आणि ज्योतीमध्ये कोणत्या कारणावरून वाद झाला ? हा वाद विकोपाला जाऊन ज्योतीला ठार मारण्याचे कारण मात्र पोपटच्या मृत्यूनंतर गुलदस्त्यात राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT