डोंबिवली : मोठागाव-माणकोली उड्डाण पूल हद्दीत दोन दिवसांपूर्वी नारपोली पोलिसांनी ८४ लाखाचा गांजा तस्करांकडून पकडल्याची घटना ताजी असतानाच क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास कल्याण पश्चिमेतील कल्याण-पडघा रस्त्यावरील गांधारे पुलावर गुजरातमधून तस्करीने आणलेला ८७ लाख ३७ हजार ४७२ रूपयांचा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्य साठा जप्त केला आहे. या कारवाईत क्राईम ब्रँचने तोडले गुजरात/महाराष्ट्र कनेक्शन तोडून गुटखा माफियांना जोरदार चपराक दिली आहे.
या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थान राज्यातील रहिवासी असलेल्या धनराज रामगोपाल स्वामी (४१, रा. मु. पो. लालासी ता. लक्ष्मणगढ, जि. शिकर, राज्य राजस्थान) याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या धनराज स्वामी याने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याच्या अन्य तस्कर साथीदारांंच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयशर टेम्पोमधून धनराज स्वामी हा गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्न वस्तू घेऊन गुजरातमधून कल्याणकडे येत होता.
गुजरात राज्यातून गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखुजन्य वस्तू घेऊन एक आयशर टेम्पो कल्याण शहराच्या दिशेने निघाल्याची खबर खासगी गुप्तहेरांकडून क्राईम ब्रँचच्या कल्याण युनिटमध्ये येऊन आदळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित शिंदे यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील, उपनिरीक्षक विनोद पाटील, किरण भिसे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दत्ताराम भोसले, बालाजी शिंदे, सुधीर कदम, गुरूनाथ जरग, विलास कडू, विजय जिरे, प्रशांत वानखेडे, गोरक्षनाथ पोटे, सचिन भालेराव, पांडुरंग भांगरे, उल्हास खंदारे, सचिन कदम, मिथुन राठोड, दीपक महाजन, सतीश सोनवणे, विनोद चन्ने, गणेश हरणे, गोरक्ष शेकडे, आदिक जाधव यांचे पथक तैनात केले. हा टेम्पो महामार्ग सोडून पोलिसांना चकवा देण्यासाठी अंतर्गत रस्त्यांवरून धावत असल्याची माहिती क्राईम ब्रँचला अवगत होती. हा टेम्पो भिवंडीतील पडघ्याकडून गांधारे पूल मार्गे कल्याण शहरात येण्याची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ निरीक्षक अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने कल्याणमधील गांधारे पूलाजवळ शुक्रवारी मध्यरात्रीपासून सापळा लावला होता.
शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास गांधारे पूलाजवळ आलेल्या आयशर टेम्पोला रोखले. मात्र तरीही ड्रायव्हरने टेम्पो जोरात पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अखेर पथकाने पाठलाग करून काही अंतरावर त्याला रोखले. आपण जाळ्यात अडकल्याची जाणीव टेम्पोचा ड्रायव्हर धनराज स्वामी याला झाली आणि त्याने टेम्पो जागीच थांबवला. टेम्पोची झडती घेतली असता त्यात प्रतिबंधित गुटखा, तंबाखुजन्य पदार्थांचा मोठा साठा आढळून आला.
ड्रायव्हर धनराज स्वामी याची चौकशी केली असता त्याने त्याच्या अन्य साथीदारांची माहिती दिली. या प्रकरणी क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीच्या आधारे ड्रायव्हर धनराज स्वामी याच्या अन्य साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातमधून हा गुटखा कोठून भरला? त्यांचा मुख्य म्होरक्या कोण आहे ? कल्याण-डोंबिवलीत हा गुटखा आणि तंबाखुजन्य पदार्थांची विक्री कुणाला केली जाणार होती? यापूर्वी अशाप्रकारे टेम्पोच्या माध्यमातून किती वेळा तस्करी करण्यात आली ? याचा चौकस तपास जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, क्राईम ब्रँचचे अपर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले, पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि अजित शिंदे आणि त्यांचे सहकारी पोलिस उपनिरीक्षक विनोद पाटील यांनी सुरू केला आहे.