Kalyan Fraud 
ठाणे

Kalyan Fraud News| दारूच्या एजन्सीचे अमिष दाखवून सासऱ्याला जावयाने लावला ३० लाखांचा चुना!

पुणेकर जावयासह तिघांवर फौजदारी कारवाई, कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांकडून चौकशी सुरू

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : दारू वितरणाच्या एजन्सीसह परवाना देतो, अशी थापेबाजी करून पुणे जिल्ह्यात राहणाऱ्या दोघा इसमांसह जावयाने कल्याणकर व्यापाऱ्याची ३० लाख रूपयांची फसवणूक केल्याचा प्रकार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतून समोर आला आहे. पाच वर्षांपूर्वी घडलेल्या फसवणूक प्रकरणी कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला आणि फळांच्या व्यापाऱ्याने शुक्रवारी बाजारपेठ पोलिस ठाण्यात जाऊन तशी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

या संदर्भात सदाशिव टाकळकर (६५) या कल्याणमधील फसवणूक झालेल्या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून बाजारपेठ पोलिसांनी पवन दशरथ हगवणे (रा. गिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा-पुणे), शरद रामभाऊ गायकवाड (रा. श्रीरामपूर, नर्सरी, अहिल्यानगर, पुणे) आणि टाकळकर यांचे जावई महेंद्र पिराजी खिलारे (रा. शिरवली, तालुका आंबेगाव, जिल्हा-पुणे) यांच्या विरूध्द भारतीय न्याय संहितेच्या कलम ४२०, ४६५, ६७ अशा अनेक कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

  सदाशिव टाकळकर यांनी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार पवन हगवणे, शरद गायकवाड आणि जावई महेंद्र खिलारे या तिघांनी आपणास ठाणे जिल्ह्यासाठी नॅचरल हर्बल बिअर आणि नॅचरल हर्बल व्हिस्की या कंपनीची वितरण एजन्सी आणि मद्य वितरण परवाना देतो, असे अमिष दाखवले. सन २०२१ मध्ये जावई महेंद्र यांनी आपली ओळख गायकवाड, हगवणे यांच्याशी करून दिली होती. पाच वर्षांपूर्वी जावई महेंद्र हे त्यांचे मित्र पवन हगवणे यांच्यासह कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधील आपल्या व्यावसायिक गाळ्यात आले होते. त्यावेळी पवन हगवणे यांनी आमची पुण्यातील एरवंडणे येथे हर्बाेहोल डिस्टलिरिज नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या माध्यमातून आम्ही नॅचरल हर्बल बिअरसह व्हिस्कीचे उत्पादन आणि विक्री करतो. कंपनीचे संचालक असल्याचे सांगून पवन हगवणे यांनी शरद गायकवाड यांच्याशी बोलणे करून दिले. तुम्हाला ठाणे जिल्ह्यासाठी आमच्या मद्य विक्रीची एजन्सी आणि मद्य वितरण परवाना देतो, असे त्यांनी अमिष दाखविले.

मध्यस्थी जावयावर विश्वास ठेवणे पडले महागात

कोरोना महामारीच्या काळात आर्थिक परिस्थिती नाजूक झाली होती. त्यामुळे आपल्या व्यवसायाला जोड म्हणून व्यापारी सदाशिव टाकळकर यांनी जावई महेंद्र खिलारे यांच्यावर विश्वास ठेऊन ही एजन्सी घेण्याचे ठरवले. मद्यविषयक काही माहिती टाकळकर यांना हगवणे यांनी दिली. एजन्सी आणि मद्य विक्री परवान्यासाठी ३० लाख रूपये द्यावे लागतील, असे तक्रारदार सदाशिव टाकळकर यांना सांगण्यात आले. जावई मध्यस्थी असल्याने आपला विश्वासघात होणार नाही असा विचार करून तक्रारदार टाळकर यांनी हगवणे आणि गायकवाड यांच्या बँक खात्यावर ऑनलाईनच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने एकूण ३० लाख रूपये पाठवले.

विचारणा केल्यास ठार मारण्याची धमकी

बराच कालावधी उलटल्यावर टाकळकर यांनी जावई खिलारे यांना एजन्सी आणि परवान्याबाबत विचारणा सुरू केली. त्यावेळी खिलारे हे सासऱ्यांना आपले काम होईल, असे आश्वासन देत होते. तक्रारदार टाकळकर यांनी हगवणे आणि गायकवाड यांच्याशी संपर्क साधून आपले काम लवकर करा. होत नसेल तर पैसे परत करा, अशी विचारणा केली. तुमच्याकडून काम होईल असे वाटत नसल्याचा संशय व्यक्त केल्याने पवन हगवणे आणि शरद गायकवाड यांनी टाकळकर यांना शिवीगाळ करत पुन्हा फोन केल्यास ठार मारण्यात येईल, अशी धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यानंतर व्यापारी सदाशिव टाकळकर यांनी कागदोपत्री पुराव्यांसह बाजारपेठ पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक निसार तडवी अधिक तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT