कल्याण : कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून, दिवाळीआधीच त्यांना नुकसान भरपाई दिली जाणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाकडून देण्यात आली.
कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीआधी दिलासा मिळाला आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सप्टेंबर महिन्यात पावसाने हाहाकार माजवला होता. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. होत्याचे नव्हते झाले. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. शेतकरी संकटात आहे.
बळीराजा मेटाकुटीला आल्याचे चित्र पाहायला मिळाले. नद्यांना पूर आल्याने पिकांचेच नुकसान झाले नाही, तर शेतातील मातीही खरवडून गेली आहे. सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. कल्याणमधील शेतकऱ्यांसाठी दिवाळी आधीच गोड बातमी मिळणार आहे. दिवाळीआधी त्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती तहसीलदार कार्यालयाने दिली.
दरम्यान मुसळधार पावसाचा फटका कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात बसला. अतिवृष्टीमुळे नद्यांना पूर आले होते. पिके बुडाली होती.शेतीचे नुकसान झाले होते. काही शेतकऱ्यांच्या घरातही पाणी घुसले होते. शेती बरोबरच घरांचेही नुकसान झाले. कल्याणमध्ये भात पीक घेतले जाते. भातशेतीसाठी शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात खर्च होतो.
हा सगळा खर्च पाण्यात गेला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होताना महसूल विभाग, ग्रामपंचायत तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्या माध्यमातून पंचनामे करण्याचे काम पूर्ण झाले आहे. यात 875 हेक्टर वरील भातपिकांचे नुकसान तर सुमारे 3,667 शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
विस्कटलेली घडी बसणार...
नुकसानीच्या अनुषंगाने पंचनामे व याद्यांचे काम पूर्ण झाल्याची माहिती कल्याणचे तहसीलदार यांनी दिली आहे. त्याचबरोबर दिवाळीआधी शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान पावसाने शेतीचे झालेले नुकसान हे मोठे आहे. सरकारी अनुदान हे त्यामानाने तुटपुंजे असणार आहे. तरीही शेतकऱ्यांची विस्कटलेली घडी बसण्यासाठीची मदत थोडी का होईना, होणार आहे.