डोंबिवली : कल्याण-कसारा रेल्वेमार्गावरील खडावली स्थानकाजवळ ट्रॅकवर नेऊन 70 वर्षीय वृद्धाला बेदम मारहाण करून त्या वृद्धाकडील सोन्याची चेन व मोबाईल घेऊन दोघे बदमाश पसार झाले होते. या प्रकरणी वृद्धाने दाखल केलेल्या तक्रारीवरून त्यांना लुटणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या कौशल्याने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. लुटारूंपैकी एकजण कचऱ्याचा घंटा गाडीवर, तर दुसरा मिठाईच्या दुकानात नोकरी करत असल्याचे चौकशी दरम्यान समोर आले आहे.
खडावली परिसरात राहणारे अनंत नांदलकर हे काही दिवसांपूर्वी कामानिमित्ताने बाहेर गेले होते. संध्याकाळी ते पुन्हा खडवली स्टेशनला आले. खडवली रेल्वे स्टेशनवर लोकलमधून उतरताच त्यांना दोन तरूण भेटले. त्या दोघांनी अनंत यांना बोलण्यात गुंतवून रेल्वे स्टेशनपासून जवळपास 200 मीटर अंतरावर नेले. या दोघांनी त्यांच्याकडील सोन्याची चेन आणि मोबाईल हिसकावून घेतला. अनंत यांनी लुटारूंना जोरदार प्रतिकार केला. मात्र बेदम मारहाणीत अनंत हे गंभीर जखमी झाले. रेल्वे मार्गाच्या बाजूला बेशूद्ध अवस्थेत टाकून त्यांच्या खिशातील पर्स काढून दोघे बदमाश पसार झाले. काहीवेळाने रहिवाशांना अनंत हे रेल्वे मार्गाच्या बाजूला पडल्याचे दिसताच त्यांना रूग्णालयात दाखल केले. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी रूग्णालयात जाऊन अनंत नांदलकर यांच्या जबानीनुसार गुन्हा दाखल केला.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची तीन पथके या प्रकरणाचा तपास करत होते. खडवली स्थानक परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फूटेज तपासले. पोलिसांनी तात्काळ तपासचक्रांना वेग दिला. शोध मोहीम सुरू असतानाच अखेर कल्याणनजीकच्या विठ्ठलवाडी परिसरातून शंकर शिरसाट आणि नरेंद्रसिंग गौतम या दोघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या.