डोंबिवली: कल्याण पूर्वेकडे असलेल्या तिसगाव येथील नामदेववाडी ते पुनालिंक रोड दरम्यानचा रस्ता गेल्या २० ते २५ वर्षांपासून अपूर्णावस्थेत असल्यामुळे स्थानिक रहिवासी, शाळकरी मुले आणि अबाल-वृद्धांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
तत्कालीन आमदार हरिश्चंद्र पाटील यांच्या विकास निधीतून आणि माजी नगरसेविका रेवती गायकवाड यांच्या पाठपुराव्याने मंजूर झालेला सहा मीटरचा रस्ता आजही पूर्ण झालेला नसल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
या मार्गावरील बाधित बांधकामे हटवून नामदेववाडी ते पुनालिंक रोड पर्यंत जोडणारा दोन्ही बाजूंनी रस्ता तयार करण्यात आला होता. या रस्त्यासाठी अनेक रहिवाशांनी स्वतःची बांधकामे तोडून प्रशासनाला सहकार्य केले.
मात्र २५ वर्षे उलटूनही बाधित रहिवाशांना अद्याप कोणताही मोबदला किंवा नुकसानभरपाई मिळालेली नाही. त्यातच रस्त्यामधील दोन चाळवजा बांधकामे निष्कासित न केल्यामुळे हा रस्ता आजही अपूर्ण स्थितीत आहे.
२०१८ पासून काही विकासकांनी मूळ सहा मीटरचा रस्ता नऊ मीटरचा असल्याचे भासवून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागाकडून बांधकाम परवानग्या मिळवल्या आहेत.
मूळ सहा मीटरचा रस्ताच अपूर्ण असताना आणि नऊ मीटर रस्त्याचा कोणताही अधिकृत ठराव नसताना विकासकांना मंजुरी कशी मिळाली ? असा सवाल या भागातील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. प्रशासनाने याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
बाधितांच्या मोबदल्यासाठी रस्ता अडवला
या गंभीर समस्येमुळे अवजड वाहतुकीचा मोठा त्रास रहिवासी आणि शाळकरी विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. स्थानिक प्रशासनाने या प्रश्नाकडे त्वरित लक्ष देऊन हा रस्ता रहिवाशांसाठी सुरक्षित आणि पूर्ण स्थितीत खुला करावा, अशी आक्रमक मागणी आता जोर धरत आहे.
याच दरम्यान या रस्त्यातील बाधित रहिवाशी यांनी नामदेववाडी येथील रस्त्यावर दगडी टाकून अवजड वाहनांचा रस्ता अडवला आहे. जोपर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण होत नाही, तसेच बाधितांना मोबदला मिळत नाही तोवर आम्ही रस्ता खुला करणार नसल्याचा ठाम पवित्रा त्यांनी घेतला आहे. आता स्थानिक प्रशासन यावर काय निर्णय घेणार ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.