water supply  FIle Photo
ठाणे

KDMC Water Supply | कल्याण-डोंबिवलीत पाणी कपात; 'या' कालावधीत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थानिक स्वराज्य संस्थांना सूचना

पुढारी वृत्तसेवा

Water Scarcity Kalyan Dombivli


डोंबिवली :
अलनिनो व आयओडीच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा लांबण्याची शक्यता आहे. या संदर्भात जलसंपदा विभागाबरोबर २३ एप्रिल रोजी झालेल्या बैठकीच्या निर्णयाप्रमाणे आगामी कालावधीत पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये यासाठी पाणी कपात करण्याचे ठरले आहे.

त्यानुसार महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जांभूळ येथील जलशुध्दीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा येत्या गुरूवारी (दि. ७) दुपारी १२ वाजल्यापासून शुक्रवारी (दि.८) दुपारी १२ वाजेपर्यंत, तसेच २१ मे रोजी दुपारी १२ वाजल्यापासून २३ मे रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत २४ तासांकरिता बंद राहणार आहे. या संदर्भात एमआयडीसीने ही सूचना पारित केली आहे.

डोंबिवली औद्योगिक क्षेत्र, तळोजा औद्योगिक क्षेत्र, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगर महानगरपालिका व परिसरातील इतर ग्रामपंचायतींना एमआयडीसीच्या जांभूळ येथील जलशुद्धीकरण केंद्राकडून पाणी पुरवठा करण्यात येत असतो. पाणी टंचाईची परिस्थिती उद्भवू नये, यासाठी जलसंपदा विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी एमआयडीसी प्रशासनाने ८ ते ९ मे आणि २१ ते २२ मे या कालावधीत २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवण्याच्या सूचना सर्व प्राधिकरणांना दिल्या आहेत.

त्यामुळे ९ मे आणि १५ मे या दोन दिवशी पाणी पुरवठा कमी दाबाने होण्याची शक्यता आहे. सदर बाब रहिवाशांसह स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिका, ग्रामपंचायती, उद्योजक, पाणी पुरवठ्याचे इतर ग्राहकांच्या निदर्शनास आणण्यात येत असल्याचे एमआयडीसीच्या डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता राजाराम राठोड यांनी एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

या संदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, उल्हासनगरमहानगरपालिका, एमआयडीसीचे अधीक्षक अभियंता, कल्याण-अंबरनाथ मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन, तळोजा मॅन्यूफॅक्चरर्स असोसिएशन, अंबरनाथ एमआयडीसी विभागाचे कार्यकारी अभियंता, तळोजा इंडस्ट्रीयल असोसिएशन, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उल्हासनगर महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, आदींना कळविण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसह ग्रामपंचायती, ग्राहक रहिवासी आणि पाणी पुरवठ्याच्या इतर ग्राहकांनी या सूचनेची दखल घेऊन पाण्याचे नियोजन करावे. पाण्याचा पुरेसा साठा करून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

अलनिनो/आयओडीमुळे पाणी टंचाईचे संकट

प्रशांत महासागरातील अल निनो आणि हिंदी महासागरातील आयओडी या दोन हवामान घटकांमुळे यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात पाणी टंचाईचे गंभीर संकट उभे राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. प्रशांत महासागर तापल्याने भारतात मान्सून कमजोर होतो. २०२३ च्या अल निनोमुळे महाराष्ट्रात सरासरीपेक्षा १४ टक्के कमी पाऊस झाला. त्याचे परिणाम २०२४ आणि २०२५ मध्ये धरणांतील कमी पाणी साठ्याच्या रूपाने दिसले होते.

यंदा जर नेगेटिव्ह आयओडी तयार झाला तर आफ्रिकेकडचा समुद्र थंड आणि इंडोनेशियाकडचा भाग गरम राहील. परिणामी भारताकडे येणारे बाष्प कमी होईल. अल निनो + नेगेटिव्ह आयओडी = भीषण दुष्काळ हे समीकरण असल्याचे मत हवामान तज्ज्ञांनी नोंदविले आहे. या साऱ्याची गंभीर दखल राज्याच्याजलसंपदा विभागाने घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT