Kalyan Dombivli water shortag Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli water shortag: कल्याण-डोंबिवलीत वाहन धुलाईसाठी लाखो लिटर पाण्याचा वापर; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर चिंता

कल्याण-डोंबिवलीत एकीकडे पाण्यासाठी वणवण, तर दुसरीकडे वाहने धुण्यासाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

पुढारी वृत्तसेवा

योगेश गोडे

कल्याण: महाराष्ट्रात कमी पावसामुळे संभाव्य पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीती व्यक्त होत असताना, दुसरीकडे कल्याण-डोंबिवली शहरात मात्र वाहनांच्या धुलाईसाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होत आहे. दसऱ्याच्या सणानिमित्त दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची स्वच्छता करण्यासाठी विविध सर्व्हिस सेंटरवर वाहनचालकांची मोठी गर्दी होत आहे.

वाहने धुलाईसाठी मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जात असल्याने पाण्याच्या अपव्ययाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागण्याची शक्यता असताना, दुसरीकडे वाहनांच्या धुलाईसाठी पाण्याचा मुक्तपणे वापर होत असल्याचे चित्र शहरातील पाणी नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे.

दसरा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी, वाहनांची पूजा आणि घरातील तसेच वाहनांची स्वच्छता करण्याची परंपरा आहे.

त्यामुळे दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांकडून आपल्या दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांची धुलाई करून घेण्याला प्राधान्य दिले जाते. याच कारणामुळे कल्याण-डोंबिवलीतील अनेक वाहन धुलाई केंद्रांवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसत आहे. मात्र, या वाहन धुलाईसाठी खर्च होत असलेला लाखो लीटर पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध होते की वाहून वाया जाते, याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

कल्याण-डोंबिवलीत मोठ्या संख्येने वाहनांची धुलाई होत असताना खर्च होणारा लाखो लीटर पाणी वाया जात असेल, तर पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवण्याची गरज जोर धरू लागली आहे.

विशेष म्हणजे यंदा पावसाळ्यात अपेक्षेइतका पाऊस न झाल्यास धरणे, तलाव आणि असंख्य जलस्रोतांमधील पाणीसाठ्याचा विपरीत परिणाम पिण्याचे पाणी, घरगुती वापर, शेती आणि औद्योगिक गरजांवर होण्याची शक्यता असते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून भविष्यातील गरजांसाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

विशेषतः फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि पुढील पावसाळा सुरू होईपर्यंतच्या कालावधीत पाणीपुरवठा सुरळीत ठेवण्याचे आव्हान प्रशासना समोर उभे राहू शकते.

मात्र, आगामी काळात कल्याण-डोंबिवलीला किती पाणी उपलब्ध असेल व किती पाणीकपात करावी लागेल यासाठी नद्या-धरणातील पाणीसाठा, पावसाची स्थिती आणि पाणी नियोजन यांवर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पाणीटंचाईनंतर उपाय करण्याऐवजी आतापासूनच पाण्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

अनावश्‍यक पाणी वापर टाळा

पाणी ही दैनंदिन गरज असून जीवनाचा मूलभूत आधार आहे. घरगुती वापर, रुग्णालये, शाळा, सार्वजनिक स्वच्छतासह अत्यावश्यक सेवांसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवणे ही प्रशासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे.

त्यामुळे पाणीटंचाईची शक्यता असताना अनावश्यक वापरावर नियंत्रण ठेवणे ही प्रशासनासह नागरिकांचीही जबाबदारी आहे. वाहनांची स्वच्छता करणे चुकीचे नाही; मात्र त्यासाठी पाण्याचा अमर्याद वापर करणे टाळणे आवश्यक आहे.

कमी पाण्यात वाहन धुण्याच्या पद्धतींचा अवलंब करणे, शक्य असेल तेथे पाण्याचा पुनर्वापर करणे आणि अनावश्यकपणे नळ सुरू ठेवणे टाळणे, अशा छोट्या उपायांतूनही मोठ्या प्रमाणात पाण्याची बचत होऊ शकते.

महापालिकेने वाहन धुलाई केंद्रांसाठी पाणी वापराचे निकष स्पष्ट करून पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी तपासणी मोहीम राबवावी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी कल्याणकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

प्रशासन काय भूमिका घेणार?

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने संभाव्य पाणीटंचाईचा विचार करून शहरातील वाहन धुलाई केंद्रांचे सर्वेक्षण करून त्यांच्या परवानग्यांची तपासणी करावी आणि पाण्याच्या वापरासंबंधी नियमांचे पालन होत आहे की नाही, याकडे कटाक्षाने लक्ष केंद्रित करावे.

एका बाजूला संभाव्य पाणीटंचाईचे सावट आणि दुसऱ्या बाजूला वाहन धुलाईसाठी होणाऱ्या पाणी वापराचा प्रश्न, या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेणार, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. आज पाण्याची बचत केली, तरच उद्याच्या संभाव्य संकटाचा सामना सक्षमपणे करता येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT