Kalyan Dombivli Police warning Holi
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण पट्ट्यामधील प्रमुख नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. इमारतींची गच्ची बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. छेडछाडसह फुगाफेक रोखण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. सोमवारी रात्री पेटणारी होळी आणि मंगळवारी धुळवडीच्या दिवसभरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये, तसेच महिला/तरूणींची छेडछाड होऊ नये, यासाठी प्रमुख नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार कल्याण परिमंडळ ३ चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके साध्या वेशात शहरामध्ये गस्त घालून फुगे फेकणाऱ्यांवर कारवाई करणार आहेत. विशेष म्हणजे होळी तसेच धुळवडच्या दिवशी इमारतींच्या गच्ची बंद ठेवण्यासंबंधीच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या आहेत. सूचनांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. याशिवाय गस्त घालण्यासाठी पोलिस मित्रांची देखिल मदत घेण्यात येणार आहे.
कल्याण-डोंबिवलीच्या शहर आणि ग्रामीण भागामध्ये होळी तसेच धुळवडीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील नाक्या-नाक्यांवर धुळवड मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, मात्र गेल्या काही वर्षांपासून पाण्याने व रंगाने भरलेले फुगे फेकण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. विशेषत: महिला व तरूणींना अशा फुग्यांद्वारे लक्ष केले जाते. इमारतीच्या गच्ची व गल्लीबोळात लपून फुगे फेकले जातात. अशा फुग्याच्या माऱ्यामुळे अनेकांना मोठी दुखापत झाल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. या पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामध्ये अधिकारी व कर्मचारी, राज्य राखीव दल, होमगार्ड आदींचा समावेश आहे.
एकीकडे शहरांमध्ये वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धनासाठी प्रयत्न सुरू असतानाच दुसरीकडे मात्र होळीच्या नावाखाली वृक्षांची कत्तल करण्याचे प्रकार सुरू आहेत. ग्रामीण भागातील वृक्षांची होळीसाठी सर्रासपणे कत्तल सुरू असून त्याकडे वनविभाग मात्र कानाडोळा करताना दिसत आहे.
गोमय पर्यावरण पूरक होळीसाठी गोकास्ट (गाईचा शेणापासून बनविलेले लाकूड) याला मोठी मागणी आली आहे. अनेक ठिकाणी या प्रकारची होळी पेटविण्यात येणार आहे. अशा प्रकारची एक भव्य होळी डोंबिवली जवळच्या दावडी गावातील पाटीदार भवन हॉलच्या आवारात सोमवारी होळी पौर्णिमेला पेटणार आहे. अशा प्रकारचा होळीमुळे लाकडाचा वापर होणार नसल्याने खरी पर्यावरण पूरक होळी साजरी होईल. या होळीमुळे वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण वाढेल. गोसेवा आणि गाईच्या उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. जंगल/वृक्ष तोड कमी होईल.यामुळे चला आपण सर्वजण पर्यावरण पूरक होळी साजरी करूया, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते राजू नलावडे यांनी केले आहे.
शहर व आसपासच्या ग्रामीण भागात धुळवड मोठ्या उत्साहात खेळली जाते. मात्र दोन दिवस आधीपासूनच धुळवडचे वेध अनेकांना लागतात आणि त्यांच्याकडून इतरांवर रंग फेकण्याचे प्रकार सुरू होतात. अशाच काही अतिउत्साहींकडून भटक्या कुत्र्यांच्या अंगावर रंग फेकले जातात. मात्र या रंगामुळे त्यांच्या शरीरास इजा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे.