KDMC Area Petrol Diesel Crisis Pudhari
ठाणे

Kalyan Dombivli Fuel Shortage | कल्याण-डोंबिवलीतील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे

पुढारी वृत्तसेवा

KDMC Area Petrol Diesel Crisis

डोंबिवली :
कल्याणसह डोंबिवलीतील अनेक पेट्रोल पंपांवर इंधन संपल्याचे चित्र आहे. डोंबिवलीच्या पूर्वेला ६, तर पश्चिमेला २ असे एकूण ८ पेट्रोल पंप आहेत. त्यापैकी अनेक पंपांवर इंधनाचा साठा संपल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पेट्रोल पंपावर सध्या इंधन उपलब्ध आहे, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दुचाकी/चारचाकी वाहनचालक सकाळपासूनच रांगेत उभे राहत असल्याने वाहतूक व्यवस्थेवरही ताण पडत आहे.

एकीकडे इंधन तुटवडा जाणवत असल्याने पेट्रोल पंपावर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंधन तुटवड्याबाबत विविध अफवा पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर प्रशासनाकडून अफवांवर विश्वास ठेवू नका, इंधन पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि अनावश्यक गर्दी टाळावी, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. मात्र शहरी भागासह  ग्रामीण भागात पेट्रोल पंपावर नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याने शहरातील अनेक पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

अनेक पेट्रोल बुधवार, गुरुवारपासून पंपावर ऑऊट ऑफ स्टॉकचे बोर्ड झळकायला सुरुवात झाली आहे. तर जिथे पेट्रोल उपलब्ध आहे, त्या पंपावर भल्या मोठ्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. वाहनात पेट्रोल – डिझेल भरून घेण्यासाठी  गुरुवारपासून अनेक पेट्रोल पंपावर वाहनधारकांची झुंबड उडाली आहे. बंद असलेल्या पेट्रोल पंपावर सकाळी ५ वाजल्यापासून रांगा लागल्या आहेत. पेट्रोल पंप चालू करण्यापूर्वीच अनेक पेट्रोल पंपावरून लाऊड स्पीकर मधून ग्राहकांना सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तर रांगेवरून ग्राहकांमध्ये वाद होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा थेट रस्त्यावर आल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे.

कोणत्या तरी अफवांना बळी पडून पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी लोक धाव घेत आहेत. प्रमाणाच्या बाहेर वाहने इंधन भरण्यासाठी येत असल्याने स्टॉक लवकर संपतो. ज्या प्रमाणे पेट्रोल पंपावर वाहनांची गर्दी असते, तशी गर्दी नवी मुंबई येथील पेट्रोल टर्मिनलवर पुरवठा करणाऱ्या टँकरची होत असल्याने कधी कधी टँकर यायला उशीर होत आहे.

ज्यावेळी इंधन मुबलक उपलब्ध असते तेव्हा सर्वांना इंधन मिळायला हवे, यासाठी काही नियम करावे लागत आहे.अनेकदा पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ आली तरी रांगा असतात , त्यामुळे रांगेतील शेवटच्या ग्राहकाला इंधन देण्याचा प्रयत्न केला जातो. तरी अनेकदा तणावाची स्थिती निर्माण होत असल्याने पोलिसांची मदत घ्यावी लागत आहे. 
- विलास म्हात्रे : मिहिर पेट्रोल पंप मालक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT