कल्याण-डोंबिवलीत रखडलेल्या भात पेरण्यांना वेग pudhari photo
ठाणे

Rice sowing : कल्याण-डोंबिवलीत रखडलेल्या भात पेरण्यांना वेग

दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा; शेतकऱ्यांची पेरणीसाठी धावपळ

पुढारी वृत्तसेवा

सापाड : योगेश गोडे

महिनाभरापासून पावसाच्या प्रतीक्षेत डोळे लावून बसलेल्या कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील शेतांमध्ये पुन्हा एकदा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून रखडलेल्या भात पेरण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र शेतात राबताना दिसत आहेत.

पावसाच्या आगमनाने शेतकरी बांधवांचे चिंतेचे सावट दूर झाले असले तरी उशिरा झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात, विशेषतः सात जूनच्या आसपास मान्सून दाखल होईल, या अपेक्षेने शेतकरी आधीपासूनच पेरणीची संपूर्ण तयारी करून ठेवतात. दर्जेदार बियाणे, खतांची खरेदी, नांगरणी, बैलजोडी किंवा ट्रॅक्टरची व्यवस्था, शेतांची मशागत अशी सर्व तयारी वेळेत पूर्ण केली जाते. यंदाही शेतकऱ्यांनी ही सर्व तयारी केली होती. मात्र, मान्सूनने जवळपास महिनाभर दडी मारल्याने संपूर्ण नियोजन कोलमडले.

कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून आहे. विशेषतः भात हे प्रमुख पीक असल्याने वेळेत पाऊस न पडल्यास त्याचा फटका उत्पादनावर होतो. यंदा जून महिना जवळपास कोरडाच गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस वाढ होत होती. शेत तयार होते, बियाणे तयार होते; पण पावसाअभावी पेरणी करायची कशी, हा प्रश्न प्रत्येक शेतकऱ्यासमोर उभा राहिला होता. अनेक ठिकाणी जमिनींना भेगा पडल्या होत्या. त्यामुळे शेतीची सर्व कामे ठप्प झाली होती.

काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अंदाजावर आणि प्रारंभी झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून ७ जूनपूर्वीच भात पेरणी केली होती. मात्र त्यानंतर पावसाने जवळपास महिनाभर विश्रांती घेतल्याने अंकुरलेली रोपे सुकून गेली. परिणामी अशा शेतकऱ्यांना पुन्हा नव्याने बियाणे टाकून दुबार पेरणी करावी लागत आहे.

यामुळे बियाणे, मजुरी, मशागत आणि इतर खर्चात मोठी वाढ झाली असून आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार पडला आहे. मात्र मंगळवारपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे भात लागवडीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून गावागावांत शेतकऱ्यांची एकच धावपळ सुरू आहे. पहाटेपासून संध्याकाळपर्यंत शेतकरी कुटुंबासह पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी पारंपरिक तर काही ठिकाणी आधुनिक यंत्रांच्या मदतीने पेरणीची कामे सुरू आहेत.

महिनाभरापासून ओस पडलेली शेतं आता पुन्हा जिवंत झाल्याचे चित्र दिसत आहे. शेतकऱ्यांसोबत महिला, युवक, मजूर वर्गही पेरणीच्या कामात सहभागी झाला आहे. शेतीची लगबग पाहता ग्रामीण भागात उत्साहाचे वातावरण आहे. मात्र, दुबार पेरणीमुळे अनेक शेतकऱ्यांचा खर्च दुपटीने वाढला आहे. बियाणे, खत, मजुरी, ट्रॅक्टर, इंधन व इतर शेतीसाठी खर्चामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. दुबार पेरणीस शेतकऱ्यांनी बियाण्यांची योग्य निवड करून संतुलित खत व्यवस्थापन करावे, असा सल्लाही देण्यात येत आहे.

पावसामुळेे शेतीला नवसंजीवनी

मंगळवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा आशेचे हास्य फुलले असले, तरी खरी परीक्षा अद्याप बाकी आहे. पुढील काही आठवड्यांत पावसाने सातत्य राखले तरच भात पिकाची वाढ चांगली होईल आणि शेतकऱ्यांना समाधानकारक उत्पादन मिळेल. महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर सुरू झालेल्या या पावसाने शेतीला नवसंजीवनी दिली आहे. आता रखडलेल्या पेरण्या पूर्ण करून भरघोस पीक घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून कल्याण तालुक्यातील शेतकरी नव्या आशेने शेतात उतरला आहे. ग्रामीण भागात सुरू असलेली ही लगबग पेरणीची नसून, ती शेतकऱ्यांच्या नव्या आशा, नव्या विश्वास आणि नव्या उमेदीची साक्ष देणारी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT