नेवाळी : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (ठाकरे गट) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत युतीचे स्पष्ट संकेत मिळू लागले आहेत. त्यामुळे सत्ताधारी शिंदे गटाच्या गोटात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वरूण सरदेसाई यांनी मनसे नेते राजू पाटील यांची घेतलेली भेट ही केवळ औपचारिक नसून, आगामी केडीएमसी निवडणूक एकत्र लढवण्याचा ठाम निर्धार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
“मनसे आणि शिवसेनेला मतदान करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. ठाकरेंवर प्रेम करणारा जनसमुदाय आजही कल्याण-डोंबिवलीत मोठ्या संख्येने आहे. ठाकरे बंधू एकत्र आले, तर ताकद नक्कीच दिसून येईल,” असे स्पष्ट शब्दांत सरदेसाई यांनी सांगितले आहे. हा इशारा म्हणजेच सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेत फूट पाडणाऱ्या शिंदे गटाला थेट आव्हान मानले जात आहे.
दरम्यान, मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याबाबत बोलताना वरूण सरदेसाई यांनी सरकारच्या दुटप्पी भूमिकेवर घणाघाती टीका केली. “कोकाटे यांना शिक्षाच झाली होती ना ? मग हे आधीच का झालं नाही?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भ्रष्टाचार, गैरकारभार आणि नैतिक अधःपतन झाकण्यासाठी सत्ताधारी केवळ वेळकाढूपणा करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकीकडे लोकशाही, नैतिकता आणि न्यायाच्या गप्पा मारायच्या आणि दुसरीकडे दोषींना पाठीशी घालायचे, हीच शिंदे सेनेची खरी ओळख असल्याचा घणाघात सरदेसाई यांनी केला. ठाकरे गट आणि मनसेची संभाव्य युती ही केवळ निवडणुकीपुरती नसून, जनतेच्या विश्वासघाताला उत्तर देण्यासाठी उभे राहिलेले आंदोलन असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.