ठाणे

KDMC Mayor : हर्षाली थविल-चौधरी कल्याण-डोंबिवलीच्या नव्या महापौर; राहुल दामले उपमहापौर

महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली.

पुढारी वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेला ६ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शहराला नवे कारभारी मिळाले असून, महापौर पदी शिवसेनेच्या ॲड. हर्षाली थविल-चौधरी तर उपमहापौर पदी राहुल दामले यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

निवडणूक ठरली केवळ औपचारिकता

मंगळवारी महापालिकेच्या सभागृहात विशेष सर्वसाधारण सभा पार पडली. मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने ही निवड बिनविरोध झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी अधिकृत घोषणा करताच सभागृहात टाळ्यांच्या कडकडाटात नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले.

प्रशासकीय राजवटीला पूर्णविराम

२०२० मध्ये लोकनियुक्त सभागृहाचा कार्यकाळ संपल्यानंतर कोविड महामारीमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. परिणामी, महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. यापूर्वी १९८३ ते १९९५ अशी प्रदीर्घ १२ वर्षे प्रशासकीय राजवट होती. त्यानंतरची ही दुसरी मोठी प्रशासकीय राजवट बुधवारी लोकनियुक्त प्रतिनिधींच्या निवडीमुळे संपुष्टात आली.

सभागृहात रंगली राजकीय फटकेबाजी: 'क्रिकेटची टीम कबड्डीची झाली'

निवड प्रक्रिया पार पडत असतानाच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना (यूबीटी) गटावर निशाणा साधताना तुफान फटकेबाजी केली. युबीटीच्या गटनेत्यांना टोला लगावताना पोटे म्हणाले, "तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा तुमची क्रिकेटची टीम होती, पण या सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची टीम झाली आहे." पोटे यांच्या या उपरोधिक टोल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली

नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रियेनंतर सभागृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी सर्वपक्षीय नगरसेवक उपस्थित होते. कल्याण-डोंबिवलीला ६ वर्षांनंतर पूर्णवेळ महापौर मिळाल्याने आता शहराच्या रखडलेल्या विकासकामांना गती मिळेल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT