कल्याण : सतीश तांबे
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (केडीएमसी) महापौरपदासाठी मॅजिक फिगर गाठण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे हाय व्होल्टेज पॉलिटिक्स पाहावयास मिळाले. महापौर पदासाठी बहुमताचा 62 हा जादूई आकडा गाठण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच नगरसेवकांनी पाठिंबा जाहीर केला.
भाजपला सत्तेबाहेर ठेण्यासाठी सुरू झालेल्या या खेळात उतरत काँग्रेसच्या दोन, राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एक अशा तीन नगरसेवकांनीही शिंदे सेनेला बाहेरून पाठिंबा दिला. त्यातच ठरल्याप्रमाणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल झाले आणि तेही शिंदे सेनेच्या गळाला लागले. परिणामी स्वतःच्या 53 नगरसेवकांसह शिंदेसेनेने बहुमताचा 62 आकडा पार करू आपले संख्याबळ 65 वर पोहोचवले.
एकीकडे कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर आणि ठाणे या तिन्ही महापालिकेत महायुतीचीच सत्ता स्थापन होईल व महायुतीचाच महापौर बसेल, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले असताना दुसरीकडे कल्याण-डोंबिवलीत भाजपला बाजूला ठेवून शिंदे सेनेने विरोधकांना सोबत घेत बहुमताचा आकडा गाठल्याने महायुतीचे राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
केडीएमसीची निवडणूक शिवसेना शिंदे गट व भाजपाने महायुती म्हणून लढविली. शिंदे सेनेचे 53, भाजपचे 50 असे 103 नगरसेवक महायुतीचे निवडून आले. त्याखालोखाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 11 जागा मिळाल्या. मनसेचे 5,तर काँग्रेसचे 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा 1 असे 122 नगरसेवक विरोधात निवडून आले. शिंदेसेना आणि भाजप यांच्यात तीन जागांचेच अंतर असल्याने महापौर पदाची चुरस या दोन मित्रपक्षांमध्येच निर्माण झाली. आधीच अंबरनाथमध्ये शिंदेसेना व भाजपचे बिनसलेले असल्याने शिंदेसेनेने कल्याण-डोंबिवलीत महापौरपदावर दावा करत अत्यंत गतीने राजकीय चाली खेळल्या.
निकालाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरेंच्या 11 नगरसेवकांचा गट फुटला. विभागीय आयुक्तांकडे या गटाची स्थापना होण्यापूर्वीच 2 नगरसेवक नॉट रिचेबल झाले. ते शिंदे सेनेच्या संपर्कात होते. पाठोपाठ उद्धव ठाकरेंच्या अन्य 2 नगरसेवकांनी मनसेला पाठिंबा दिल्याचे स्पष्ट केले. हे दोघे मनसेतूनच उद्धव ठाकरेंकडे निवडणूक लढवण्यासाठी आले होते आणि जिंकलेही. शेवटी उद्धव सेनेला उर्वरीत 7 नगरसेवकांचाच गट विभागीय आयुक्ताकडे मंगळवारी स्थापन झाला व गटनेतेपदी उमेश बोरगांवकर यांची निवड केली.
शिंदे, मनसेचा गट स्थापन
बुधवारी शिंदे सेनेने आपल्या 53 नगरसेवकांचा गट स्थापन करत गटनेतेपदी ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी निवड केली. मनसेनेही 5 नगरसेवकांचा गट स्थापन करुन गटनेते पदी प्रल्हाद म्हात्रे यांची गटनेते पदी निवड केली. गटस्थापनेच्यावेळी शिंदे सेनेच्या नगरसेवकासोबतच मनसेचेही नगरसेवक उपस्थित होते. मनसेच्या या पाच नगरसेवकांनी शिंदे सेनेला पाठिबा देत कल्याण-डोंबिवलीची सत्ताकारण फिरवले. भाजपला कल्याण-डोंबिवलीच्या सत्तेबाहेर ठेवण्यासाठी मग काँग्रेसचे दोन व राष्ट्रवादी शरद पवार गटाचा एक असे तिघे नगरसेवकही बाहेरून पाठींबा देत शिंदे सेनेसोबत आले आहेत.
त्या चौघांचा पत्ता निर्णायक
ठाकरे सेना, शिंदे सेना, मनसे, काँग्रेस यांनी आपापले स्वतंत्र गट स्थापन केले असले तरी उद्धव सेनेचे नॉट रिचेबल असलेले 2 नगरसेवक आणि मनसेला पाठिंबा देणारे ठाकरेंचे अन्य 2 नगरसेवक हे कोणत्याही गटात सहभागी झालेले नाहीत. त्यामुळे 65 चे संख्याबळ गाठण्यात या चार जणांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. मात्र हे चौघेही शिंदे सेनेच्या संपर्कात असल्याने शिंदे सेनेचे पारडे जड झाले हे स्पष्ट आहे.
दरम्यान भाजपने अद्याप गट स्थापन केलेला नाही. सत्तेसाठी कोणी महायुतीला पाठिंबा देत असले तर त्याचे स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया भाजपच्या गोटातून व्यक्त केली जात आहे. मात्र भाजपची या प्रकरणातील पार्टी लाईन अद्याप उघड करण्यात आलेली नाही. त्यामुळे भाजपचा पत्ता अद्याप उघड नाही. शिंदे सेनेने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे.
अंबरनाथ, बदलापूर पराभवाचा वचपा
अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या शिंदे सेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. त्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिंदे सेनेकडून कल्याण-डोंबिवलीत ही राजकीय खेळी खेळण्यात आली अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी मात्र राजकीय खेळी खेळली पण महापौर महायुतीचा असेल असे सांगितले आहे. महापौर शिंदे सेनेचाच असेल असे कुठेही म्हटलेले नाही.
मनसेने काढला भाजपचा वचपा
केडीएमसी निवडणूक जाहिर होताच भाजपने त्यांच्या पक्षात विविध पक्षातील माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते फोडण्याचा धडाका लावला होता. निवडणूकीची प्रक्रिया सुरु होताच मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष मंदा पाटील यांना भाजपने प्रवेश दिला. पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली. तसेच जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांना सुद्धा पक्षात घेत त्यांना भाजप कडून उमेदवारी दिली. सगळयात मोठा कहर म्हणजे मनसेचे शहर प्रमुख मनोज घरत हे भाजप उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात उभे होते. घरत यांना भाजपने माघार घेण्यास भाग पाडल्याने भाजपचे महेश पाटील हे बिनविरोध निवडून आले.
निवडणूकीत भाजपने मनसे फोडली. कल्याण डोंबिवलीत भाजपने मनसेला खिंडार पाडले. ही सल मनसेच्या मनी खोलवर होती. भाजपने केलेले राजकारण हे मनसेच्या जिव्हारी लागले होते. त्यामुळे शिंदे सेनेला मनसेने पाठिंबा देत भाचपचा वचपा काढला आहे. मनसेने शिंदे सेनेला पाठिंबा देत भाजपने मनसे सोबत केलेल्या राजकारणाचा सगळा हिशोब चुकता करुन टाकला आहे. मनसेने शिंदे सेनेला दिलेल्या पाठिंब्याची राजकारणात जोरदार चर्चा आहे.
मुंबईत ठाकरे गटाला गळती
मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक निकालाच्या 6 दिवसांत उद्धव ठाकरे यांना मुंबईत मोठा धक्का बसला आहे. चांदिवली विधानसभा मतदार संघातील वॉर्ड क्रमांक 157 मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) विजयी झालेल्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे.बुधवारी मुंबई महापालिकेचे गट स्थापन करण्याच्या वेळीही त्यांनी दांडी मारली.
पत्त्यातील बंगलाही जास्त टिकतो ः भाजप
मुंबई : कल्याण-डोंबिवलीत मनसेच्या नगरसेवकांनी शिंदे गटाची सोबत करण्याचा निर्णय केला. पत्त्यातील बंगलासुद्धा यापेक्षा जास्त टिकतो, अशा शब्दांत भाजपने शिवसेना ठाकरे गटाला डिवचले. निकाल लागून चार दिवस झाले. महाराष्ट्राच्या हिताकरता दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या उद्धव ठाकरे व संजय राऊत यांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच,तिकडे कल्याण-डोंबिवलीमध्ये मनसेने उबाठाची साथ सोडलीच,उबाठाच्या नगरसेवकांनीही ‘जय महाराष्ट्र’ केला, असे भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये म्हणाले.
आम्ही निवडणूक वेगवेगळी लढली असली तरी कल्याण-डोंबिवलीच्या विकासासाठी जे बरोबर येतील त्यांना एकत्र घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. विरोध नसेल तर विकासातही अडचण येत नाही. मनसेचे नेते राजू पाटील माझे मित्र आहेत. त्यांनी विकासासाठी महायुतीला समर्थन दिले.डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार
मनसेचा निर्णय स्थानिक - युती-आघाडी करण्याचे अधिकार राज ठाकरे यांनी स्थानिक नेतृत्वाला दिले आहेत. स्थानिक राजकीय गणिते आणि परिस्थितीनुसार स्थानिक नेतृत्वाने सदर निर्णय घेतला असावा. चंद्रपुरात ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला जसा स्थानिक पातळीवर पाठिंबा दिला, तसाच हा स्थानिक निर्णय असू शकतो.संदीप देशपांडे, मनसे प्रवक्ते
कामांसाठी पाठिंबा -2010 आणि 2015 साली महापौर पदाच्या निवडणुकीत मनसे तटस्थ होती. विरोधी बाकावर होती. मनसेचे 2010 साली 28 नगरसेवक निवडून आले होते. 2015 साली 9 नगरसेवक निवडून आले होते. यावेळी 5 नगरसेवक निवडून आले. नागरिकांची कामे व्हायची असतील तर विरोधी बाकावर बसून होणार नाही. त्यामुळे सत्तेला पाठिंबा दिल्याचे मनसे नेते राजू पाटील यांनी स्पष्ट केले आहे.राजू पाटील, मनसे नेते